दहीहंडी साजरी करताना नेहमीच पाऊस का पडतो? पौराणिक कथेत आहे याचे कारण

dahi handi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. उंचावर बांधलेल्या मडक्यातून लोणी काढण्याचा आनंद गोविंद वेगवेगळया ठिकाणी जाऊन अनुभवत आहेत. अशा उत्साही वातावरणात पावसाने देखील हजेरी लावली आहे. गुरुवारी पहाटेपासून मुंबई शहरात हलक्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईत 7, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईसह इतर भागातदेखील पाऊस पडत आहे.

परंतु तुम्हाला हे माहित आहे का दरवर्षी जन्माष्टमीच्या वेळी पाऊस राज्यात हजेरी लावतो. मुसळधार पाऊस नसला तरी पावसाच्या हलक्या सरी श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी बरसाताना दिसतात. एका आख्यायिकेनुसार, श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा देखील मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे जगाचे पाप धुवून काढण्यासाठी पाऊस या शुभ मुहूर्तावर बरसतो असे म्हटले जाते. इतकेच नव्हे तर, श्रीकृष्णाचे रूप पाहून देवांच्या डोळ्यातले अश्रू पावसाच्या रूपात धरतीवर कोसळतात अशी देखील श्रद्धा भाविकांच्या मनात आहे. त्यामुळे दहीहंडीच्या काळात पाऊस पडला की गोविंदांचा मटकी फोडण्याचा उत्साह आणखीन वाढतो.

काही भाविकांची अशी मान्यता आहे की, पावसाच्या माध्यमातून श्रीकृष्ण आपल्याला आशीर्वाद देतात. भगवान श्री कृष्णाचा आनंद पावसाच्या रूपाने या धरतीवर कोसळतो. यामुळे धरती खळखळून हसते, नाचते, जन्माष्टमीचा आनंद साजरी करते. मात्र कारण काहीही असो, जन्माष्टमीला पाऊस हा शुभ सोहळा म्हणून पाहिला जातो. जन्माष्टमीच्या काळात पावसाचे येणे अत्यंत शुभ मानले जाते. पावसाच्या हलक्या सरी इथल्या मातीला, झाडांना फुलांना प्रसन्न करतात.

श्रीकृष्ण जन्माची गोष्ट

पौराणिक कथेनुसार, कृष्ण हे देवकी आणि वासुदेव यांचे आठवे अपत्य होते. देवकी ही मथुरेचा दुष्ट राजा कंसाची बहीण होती. परंतु कंसाला त्याच्या आठव्या पुतण्याकडून मारले जाईल अशी भविष्यवाणी झाली होती. ही भविष्यवाणी खरी होऊ नये म्हणून कंसाने आपल्याच बहिणीला म्हणजेच देवकी आणि तिच्या पतीला कैद करून ठेवले होते. ज्या रात्री कृष्णाचा जन्म झाला त्या रात्री वासुदेवाला एक दिव्यवाणी प्रकट झाली होती. त्याने कृष्णाला बाळाला घेऊन यमुना नदीच्या काठी असलेल्या गोकुळात पळून जाण्यास सांगितले होते. वासुदेवाने देखील सांगितल्याप्रमाणे कृष्णाला टोपलीत ठेवून नदीपार नेले. त्या रात्री देखील मुसळधार पाऊस पडत होता आणि नदीला पूर देखील आला होता. मात्र नागदेवतेच्या मदतीने वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन सुखरूपपणे गोकुळात पोहचले. तेव्हापासून ते आजपर्यंत पाऊस श्रीकृष्णाच्या जन्माची साक्ष देण्यासाठी जन्माष्टमी दिवशी बरसत असतो.