महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात विकेंडला कडक लॉकडाउन जाहीर करून सर्वत्र संचारबंदीचे आदेश लागु केले आहेत, असे असताना महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील मॅप्रो कंपनीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासून आपला व्यवसाय जोमाने सुरू ठेवला आहे. एकीकडे छोटया मोठया व्यापाऱ्यांवर दंडात्मक तर कधी सील करण्याची कारवाई करते, मात्र मॅप्रो कंपनीवर प्रशासन एवढे मेहरबान का? असा सवाल नागरीक करीत आहेत.
कोरोनाच्या बाबतीत सातारा जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे नियम शिथील होण्यास थोडा वेळ लागत आहे. सध्या आठवडयातील काही दिवस नियम शिथील करून विकेंडच्या शनिवारी व रविवारी कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या काळात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. मात्र विकेंडला महाबळेश्वर व पाचगणी येथे पर्यटकांची चांगलीच वर्दळ वाढली आहे. शनिवारी महाबळेश्वर पांचगणी रस्ता, भिलार, भौसे, नंदनवन कॉलनी या ठिकाणी मोठया प्रमाणावर पर्यटक मुक्कामी आले होते. हे सर्व आज रविवारी चेकआउट करून बाहेर पडले आहेत. या पर्यटकांना महाबळेश्वर येथे कडक बंदमुळे काही खरेदी करता आली नाही, परंतु गुरेघर येथे मॅप्रो कंपनीने आपले व्यवसाय सुरू ठेवल्याने पर्यटकांची पाउले मॅप्रो कंपनीकडे वळत आहेत. आज सकाळ पासुनच घराकडे निघालेल्या पर्यटकांनी खरेदीसाठी मॅप्रो कंपनीच्या गेटवर गर्दी केली होती. या ठिकाणी त्यांना रेस्टॉरंट मधील खादय पदार्थां बरोबरच जाम, जेली, सिरप, चॉकलेट आदी मिळत आहे. त्यामुळे पर्यटक मोठया प्रमाणावर खरेदी करीत आहेत. या ठिकाणी गर्दीमुळे कोणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम देखिल पाळताना दिसत नाही. जिल्हयात कडक लॉकडाउन आहे. सर्व आस्थापना बंद आहेत. रेस्टॉरंट मधील पार्सल सेवा देखिल विकेंड मध्ये बंद ठेवण्याचे आदेश आहेत. महाबळेश्वर येथील सर्व व्यवसायिक या नियमांचे कोटकोरपणे पालन करीत आहेत. मॅप्रो कंपनी मात्र जिल्हाधिकारी यांच्या ओदशाला हरताळ फासत असताना प्रशासन मॅप्रो कडे डोळेझाक करीत आहे. या बाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मॅप्रो कंपनीचे आणि अधिकारी वर्गाचे संबंध घनिष्ठ असल्याचा गैरफायदा मॅप्रो कंपनी घेत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. कोणी कितीही तक्रारी केल्या तरी आमच्या मालकाचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी शेखी तेथील कामगार करीत आहेत. मॅप्रो कंपनी कडुन होत असलेल्या नियमभंगा बाबतची माहीती येथील प्रत्रकारांनी प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांनी दिली. आता प्रांताधिकारी मॅप्रो कंपनीवर काय कारवाई करणार? या कडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे.
तालुक्यात महाबळेश्वर शहर वगळता सर्वत्र लॉज, हॉटेल चालु आहे. पर्यटकांना तेथे प्रवेश दिला जातो. महाबळेश्वर येथे मात्र पर्यटकांना बंदी आहे. या नियमांमुळे महाबळेश्वर करांवर अन्याय होत आहे. जर नियमांचे पालन करता येत नसेल तर महाबळेश्वर शहरा वरील निर्बंध हटवावेत अथवा पर्यटकांना प्रवेश देणारे खाजगी बंगले, लॉज, हॉटेल यांचेवर दंडात्मक किंवा सील करण्याची कारवाई जिल्हाधिकारी यांनी करावी, अशी मागणी केली जात आहे.
मॅप्रोवर तहसिलदारांना कारवाईच्या सूचना : प्रातांधिकारी
सातारा जिल्ह्यात शनिवार, रविवार कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे कोणतेही दुकान अथवा हॉटेलला सुरु ठेवण्याची परवानगी नाही. त्यामुळे मॅप्रो संदर्भात मिळालेल्या तक्रारीबाबत तहसिलदार यांना त्वरीत सुचना केल्या असून कारवाई करण्याबाबत त्यांना सुचना केल्या प्रांताधिकारी संगिता राजापूरकर यांनी सांगितले.
मॅप्रोवर पोलिस व महसूलला कारवाईच्या सूचना : तहसिलदार
मॅप्रो कंपनीने गुरेघर येथील व्यवसाय सुरु ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस व महसूलच्या संबंधित टिमला त्वरीत सुचना केल्या आहेत व कारवाई करण्यासाठी पथक गुरेघर येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी दिली.