RSSच्या ‘त्या’ कृतीचा राष्ट्रपती महोदयांनी कधी का निषेध केला नाही?

मुंबई । प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या काही शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी अभिभाषण करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली. याशिवाय ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं. राष्ट्रपतींच्या या भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ट्वीटच्या माध्यमातून राष्ट्रपती कोविंद यांना इतिहासातील घटनांची आठवण देताना काही प्रश्न केले आहेत. ‘तिरंग्याचा कधीही अपमान करणार नाही. तसंच, १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवू, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं १९४९ साली सरदार पटेल यांना लेखी दिलं होतं. आदरणीय कोविंद यांना अत्यंत दु:खी मनानं आठवण करून द्यावी लागत आहे,’ असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

‘सरदार पटेल यांना लेखी दिल्यानुसार, आरएसएसनं आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला खरा, मात्र त्याच उंचीवर स्वत:च्या संघटनेचा ध्वज फडकावून आपली नियत दाखवून दिली. हे आपण विसरलात का? असा सवाल आंबेडकरांनी यावेळी केला. शेतकरी आंदोलकांनी तिरंगा उतरवला नाही. तिरंग्याच्या १५ फूट खाली शीख धर्माचा व शेतकऱ्यांचा ध्वज फडकवला. यातून तिरंग्याचा अपमान कसा झाला? शेतकरी आंदोलकांनी तिरंग्याचा अपमान केला असं आपल्याला वाटत असेल तर १५ ऑगस्ट १९४७ साली आरएसएसनं जो काळा दिवस पाळला, त्यांचा निषेध तुम्ही का करत नाही? असा परखड सवाल करत आंबडेकरांनी राष्ट्रपतींना करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like