हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी रविवारी (१० मार्च) अखेर शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर काही पदाधिकाऱ्यांसह हा पक्षप्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि मर्जीतील नेते म्हणून वायकरांची ओळख होती. पण ‘योग्य वेळी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात,’ असं विधान त्यांनी यावेळी केले. पण त्यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशामागे काही इतर कारणेही आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. चला याबाबतच जाणून घेउया…
वायकरांची ईडी चौकशी
महाविकास आघाडीतील अनेक आमदार खासदारांवर ईडी, सीबीआय’सारख्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. त्यातच जोगेश्वरी भुखंड घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वायकरांवर पाचशे कोटींच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी वायकरांची २९ जानेवारी २०२४ रोजी तब्बल नऊ-दहा तास चौकशीही झाली. रवींद्र वायकरांनी मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. पण त्यासाठी महापालिकेची परवानगीही त्यांनी घेतली नव्हती. हा जवळपास 500 कोटींचा घोटाळा असल्याचाही आरोप सोमय्यांनी आपल्या तक्रारीत केला होता. या प्रकरणी त्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने वायकरांना चौकशीसाठी बोलावलं होतं.
ईडीची छापेमारी
गेल्या महिन्यातही वायकरांवरांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून त्यांच्यावर तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागला आहे. भाजपनेच त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. पण आज तेच वायकर शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. विरोधी पक्षात असताना घोटाळ्याचे आरोप झालेले आणखी एक आमदार आता भाजपसोबत सत्तेत सामील झाले आहेत. यावर भाजप काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागले आहे.
कालपर्यंत ठाकरेंसोबत
विशेष म्हणजे काल-परवापर्यंत रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंसोबत होते. शिवसैनिकांसमोर त्यांनी भाषणही केलं. पण चोवीस तासांच्या आतच त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपकडूनच वायकरांना शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे इतर नेत्यांप्रमाणे वायकरही तपास यंत्रणांच्या दबावामुळे शिंदे गटात सामील झाल्याचे बोलले जात आहे.
वायकरांआधी ठाकरेंच्या या नेत्यांच्या मागेही तपास यंत्रणांची चौकशी
संजय राऊत
वैभव नाईक
नितीन देशमुख
किशोरी पेडणेकर
सुरज चव्हाण
राजन साळवी
अद्वय हिरे
सुधाकर बडगुजर