वाढीव कट्टा | २०१९ सालासाठीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली आहे. भारतीय वंशाच्या अभिजीत बॅनर्जी यांना पत्नी ईस्टर दुफ्लोसह अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीयांना नोबेल पुरस्कारांची पहिल्यापासूनच उत्सुकता असल्याचं पहायला मिळतं अशा परिस्थितीत नोबेल पुरस्काराविषयीचा रंजक किस्सा आज हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांसाठी देत आहोत.
रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या ६ विषयांतील मूलभूत आणि रचनात्मक कार्यासाठी नोबेल पारितोषिक दिलं जातं. या पुरस्कारांना जवळपास १०० वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. अमेरिकेचं या पुरस्कारावर वर्चस्व राहिलं असून जवळपास निम्म्याहून अधिक पुरस्कार हे अमेरिकी संशोधक, अभ्यासकांनी मिळवलेले आहेत. वेगवेगळ्या वर्षांतील नोबेल परितोषिकांच्या मागे अनेक रंजक किस्से आहेत. त्यातीलच एक किस्सा आहे गणित विषयातील नोबेल दिलं न जाण्याचा. आल्फ्रेड नोबेलची एक मैत्रीण होती. गोस्ता मिटा ग्लॅफर असं तिचं नाव. अल्फ्रेडला ती खूप आवडायची. अल्फ्रेडने एक दिवशी स्वतःच्या प्रेमाचा ‘इजहार’ तिच्यापुढे केला आणि तिच्या मनात तसं काही नसल्याने तिने त्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. आजच्या काळात म्हणायचं झाल्यास ‘तू मला मित्र म्हणूनच चांगला वाटतोस’ टाईप तिचं बोलणं झालं असेल. या घटनेनंतर आल्फ्रेडनेसुद्धा पुन्हा लग्न करण्याचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला. आयुष्यभर तो एकटाच राहिला. लग्न न करता.
किस्सा खरं इथून सुरू होतो. आपल्या मृत्युपत्रात विज्ञान क्षेत्रातील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र हे विषय नोंदवताना नकार दिलेली आपली मैत्रीण गणिताची अभ्यासक आहे, तिला तिच्या हुशारीचा अहंभाव आहे हा विचार करून अल्फ्रेडने गणित विषय पुरस्कारासाठी ग्राह्य धरला नाही. आणि म्हणूनच गणित विषयातील नोबेल पुरस्कार दिला जात नाही. गोस्ताने आपण अल्फ्रेडला नकार दिल्याची खंतही तिच्या आत्मचरित्रात नमूद केली आहे.
गणित विषयासाठी नोबेलच्या धर्तीवर फिल्ड्स मेडल पुरस्कार देण्यात येतो.