विधवा प्रथा बंद मोहिम : पिंपरीत विधवा महिला सोबत हळदी-कुंकू कार्यक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. कोरेगाव तालुक्यातील पिंपरी या गावातील महिलांनी विधवा प्रथा बंदीचा नारा दिला आहे. गावातील महिलांनी एकत्र येत विधवा प्रथा बंद करण्यासाठी सामुदायिक प्रतिज्ञा घेऊन एकमुखी विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर करत महिलांनी विधवा महिलांच्या सोबत हळदी-कुंकू कार्यक्रम देखील घेतला.

विधवा प्रथेविरुद्ध ठराव करणारी पिंपरी ही सातारा जिल्ह्यातील तिसरी ग्रामपंचायत ठरली आहे. या अगोदर सातारा जिल्ह्यातील जकातवाडी, तांबवे या ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. तसेच साताऱ्याचा आदर्श घेत कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, सांगली जिल्ह्यातील बलगवडे, अकोला जिल्ह्यातील ढोरखेड ग्रामपंचायतींनी असा ठराव मंजूर केला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान क्रांतिसिंह नाना पाटील महिला ग्राम संघ अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या पुढाकाराने हा ठराव घेण्यात आला. यावेळी गावातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी विधवा प्रथा बंदीचा नारा देत महिलांनी अनिष्ट रूढी परंपरा बाबत विविध दाखले दिले. तसेच महिलांचे होणारे शोषण आणि रूढी कशा निर्माण होतात यावर प्रा. प्रमोदिनी मंडपे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर विधवा प्रथा बंदीसाठी सामूहिक प्रतिज्ञा देखील घेण्यात आली. महिलांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे.

Leave a Comment