हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात करोना परिस्थिती पाहता राज्यात लॉक डाऊन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य पाहता इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता राज्यातील कठोर निर्बंध लक्षात घेता ऑफलाईन परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सांगत विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, ‘ विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. आज कुलगुरू सोबत परीक्षा संदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन सुरू होत्या आता उर्वरित सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल असा निर्णय झाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत त्यामुळे निकाल लवकर लागेल राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा मनोदय आहे. 18 ते 25 वयोगटातील हे विद्यार्थी आहेत त्यामुळे त्यांचे लसीकरण होणं गरजेचं आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान लॉ च्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. प्राध्यापक भरती बाबतही चर्चा झाली आहे ही भरती करणार आहोत फक्त कोविड संकट कमी झाल्यावर हे सर्व होईल प्राध्यापक भरती होणार नाही अशा चर्चा वर विश्वास ठेवू नये. असेही उदय सामंत म्हणाले आहेत.
तेराही अकृषी विद्यापीठात उद्यापासून ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. ही परीक्षा ऑनलाईन असेल असं उदय सामंत म्हणाले.
एनसीसी व एनएसएसच्या प्रमुखांशी बोलणार आहे. हे विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होतील संजय ओक यांनी तसे आवाहन केलं होतं त्यांच्याशीही मी बोलणार आहे असे उदय सामंत म्हणाले.