औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. पण या सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. दरम्यान, आज या परवानगीबाबत सर्वंकष चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे.
निखिल गुप्ता म्हणाले, “आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आणि फील्डमधील सर्व रिपोर्ट घेऊन आज यावर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. आमच्या अधिकाऱ्यांची आज बैठक आहे, ती झाल्यानंतर सर्व बाबींचा विचार करुन आज निर्णय घेतला जाईल”
राज ठाकरे यांची आझाद मैदानावर गुढी पाडव्याच्या दिवशी मेळावा पार पडला होता. यावेळी भाषण करताना त्यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा ऐरणीवर आणला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास दीड महिन्याहून अधिक काळ हा मुद्दा चर्चेत असून भाजपनेही यामध्ये उडी घेत सरकारला सातत्यानं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
मनसेची सर्व तयारी पूर्ण, प्रचारगीतही लॉन्च –
मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी पूर्ण केली असून यासाठी खास प्रचारगीतही लॉन्च केलं आहे. पण अद्याप सभेला पोलिसांनी परवानगीच न दिल्यानं ही सभा होईल की नाही? याबाबत संभ्रम कायम आहे.