सातारा प्रतिनिधी | जावली तालुक्यातील व पाचगणी महाबळेश्वर प्रादेशिक योजनेतील कोअर बफर झोन व इकोसेन्सटीव्ह झोनमध्ये समाविष्ट असलेल्या धनदांडग्या बिल्डरकडुन नियमांची पायमल्ली करत हातगेघर मुर्हा येथील कड्याच्या टोकावर समूह बंगल्याचे अनधिकृत बांधकाम सुरु आहे. धनदांडग्यांची हौस आणि चोचले पुरवण्याकरता कड्याच्या टोकावर अवैध बांधकाम सुरु आहे. मुंबईच्या बिर्ला ग्रुपने या भागात कड्याच्या टोकावरच केलेल्या बांधकामामुळे पुण्यातील माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती याठिकाणी होण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हातगेघर मुर्हा येथील कड्याच्या टोकावर नियम आणि कायदा वेशीला टांगून धनदांडग्यांकडून अनधिकृत बांधकाम सुरु आहे. हातगेघर मुर्हा या बफर कोअर झोन व इकोसेन्सटीव्ह झोनमध्ये फक्त शेतघरालाच परवानगीची तरतुद आहे. मात्र मुंबईच्या बिर्ला ग्रुप आॅफ कंपनीकडून गट नंबर १०९२ व १०९३ मध्ये नियम पायदळी तुडवत राजेरोसपणे समुह बंगल्याचे बाधकाम सुरु आहे. याबाबत स्थानिक तलाठी ते जावली महसुल विभाग मुग गिळुन गप्प का? हा संशोधनाचा विषय झाला आहे. हातगेघर मुर्हा येथे अनाधिकृत समुह बंगल्याच्या दोन मजली इमारती उभारताना माळीणसारखा कडा कोसळण्याची दाट शक्यता आहे.
साताऱ्याचे उपविभागीय अधिकारी साहेब हातगेघर मुऱ्हाच्या अनाधिकृत बांधकामात “हाताची घडी अन् तोडांवर बोट” अशी भूमिका घेत गप्प असल्याने उपविभागीय कार्यालयासोबत साताऱ्यामधील आणखी कोण बडी धेंडं या अनाधिकृत बांधकामात सामिल आहे हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला बांधकामाकरिता हजार कागदपत्रे मागणाऱ्या महसूल प्रशासनाला, हातगेघर मुर्हा येथील कड्याच्या टोकावर अनाधिकृत बांधकामाला अभय का ? असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’