हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियामध्ये पुढील काळात काही संघटनात्मक बदल होऊ शकतात. मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी मारुती सुझुकीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत माहिती दिली. सुझुकी मोटर कॉर्पोरेशन या मूळ कंपनीच्या संपूर्ण जागतिक व्यवसायात कंपनीचे योगदान वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर पार पडलेल्या एजीएम मिटिंग मध्ये बोलताना भार्गव म्हणाले की, भविष्यात सुझुकीच्या जागतिक उत्पादनात मारुती सुझुकी इंडियाचे योगदान गेल्या वर्षी गाठलेल्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. त्यामुळे मारुती सुझुकी इंडियाकडे आणखी काही पॉवर किंवा हिस्सेदारी असू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.
बायो मिथेन गॅस इंधनाच्या क्षेत्रात उतरण्यासाठी कंपनी आपली रणनीती तयार करेल, असेही भार्गव यांनी म्हंटल . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गांधीनगरमध्ये कंपनीला चार दशके पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही सूचना केली होती. भार्गव म्हणाले की, मारुती स्पष्टपणे सुझुकी जपानचा अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यांनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांच्या वक्तव्याचा दाखल देत म्हंटल की, गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, सुझुकी समूहाने जगभरात सुमारे 28 लाख वाहनांचे उत्पादन केले, त्यापैकी 1.6 दशलक्ष युनिट्स किंवा सुमारे 60 टक्के उत्पादन भारतात झाले.
भार्गव यांनी यावेळी सुझुकीची भारतात संपूर्ण मालकीची R&D कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच भविष्यात जेव्हा आम्ही काही बदल करू, तेव्हा आम्हाला तुमच्याकडून अधिक सहकार्य मिळेल अशी आशा आहे असं म्हणत त्यांनी संघटनात्मक बदलाचे संकेत दिले. मात्र, त्यात कोणते बदल होणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. कंपनीने रविवारी गुजरातमध्ये दोन बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळासोबत (एनडीडीबी) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.