हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील हिवाळी अधिवेशन असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काल गंभीर आरोप करण्यात आले. अशातच उल्हासनगरच्या पाणीप्रश्नावरुन आमदारांनी सरकारला काही सवाल केले. मात्र सरकारकडून अपेक्षित उत्तर न आल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार आक्षेप घेतला. मुख्यमंत्री कुठे आहेत? अशी विचारणा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
यावेळी प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री उपस्थित नाहीयेत, असा आक्षेप अजित पवार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला उभे राहिले. तुम्ही सभागृह चालू देणार आहेत हे आम्हाला माहिती नव्हते, नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले असते, असा खोचक टोमणा मारला.
यावेळी पवार म्हणाले की, हिवाळी अधिवेशन सुरु होऊन प्रश्नोत्तराचा दुसरा आठवडा आणि दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांकडे मोठी आणि भरपूर खाती आहेत. त्यांच्या खात्याविषयी प्रश्नांची उत्तरे शंभूराज देसाई, उदय सामंत देत आहेत. उत्तरे कोणी द्यायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीसजी तुमच्याकडे सात ते आठ खाती आहेत. तुम्ही सगळ्या खात्यांसंबंधी उत्तरे देता. तुम्ही दुसऱ्या कोणाला उत्तर द्यायला सांगत नाही. तुम्ही तितके सक्षम आहात म्हणून देत असाल.