औरंगाबाद । कोरोना संकट काळात ज्यांच्या घरातील व्यक्ती दगावली, त्यांच्या घरातील परिस्थिती एकदा जाऊन बघा. अडचणीच्या काळात लोकांचे अश्रू पुसून त्यांना दिलासा देण्याची गरज असताना, मोर्चे काढून नाटकं कसली करता? अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केली आहे.
कोरोना रुग्णांची व मृतांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने येत्या (दि. ३० मार्च ते दि. ८ एप्रिल) आठ दिवसा दरम्यान लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनावर काही आरोप केले. आपले अपयश झाकण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वसामान्यांना वेठीस धरत असल्याचे आहे. खा. जलील यांनी बुधवारी ३१ मार्च रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यावरून आता शिवसेना आणि एमआयएममध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. इम्तियाज जलील यांच्या मोर्चा काढण्याच्या निर्णयावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे.
खैरे म्हणाले, लाॅकडाऊन कुणालाच नको आहे, पण कोरोनाची परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ द्याची नसेल तर लाॅकडाऊन शिवाय पर्याय नाही हे मान्य करावेच लागेल. लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपल्या सूचना नक्कीच करा, पण अशावेळी कुणीही राजकारण करता कामा नये. लोकांची गैरसोय, अडचण होऊ नये. यासाठी सकाळी ८ ते १२ दरम्यान सूट देऊन दुपारी बारानंतर कडक लाॅकडाऊन करावा, अशी आमची प्रशासनाला मागणी आहे. अनेक व्यापाऱ्यांनी देखील तशी मागणी केली आहे. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच भेट घेणार आहोत. अडचणीतून मार्ग काढला पाहिजे, मोर्चे काढून काय साध्य होणार आहे, असा टोलादेखील इम्तियाज जलील यांना लगावला.
आधी मास्क घालायला सांगा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्स आणि गर्दी टाळणे या नियमांचे पालन केलेचं पाहिजे. हा नियम सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी आहे. मोर्चा काढण्याची भाषा करणाऱ्या खासदारांनी आधी आपल्या लोकांना मास्क घालण्याच्या सूचना केल्या पाहिजे. पोलीस आणि प्रशासनाने देखील मास्कची कारवाई करताना भेदभाव न करता शहरातील सर्वच भागात जाऊन दंडात्मक कारवाई केली पाहिजे. सर्वसामान्य लोक संकटात आहेत, त्यांना दिलासा, मदत कशी मिळेल. यासाठी मी व माझे सहकारी सकाळी सात वाजेपासून झटत असतो. तुम्ही किती लोकांना मदत केली, किती जणांचे अश्रू पुसले. ज्या घरातील व्यक्ती कोरोनाने गेली, त्यांच्या घरात जाऊन कधी बघितले का ? असा सवाल करतानाच मोर्चाचे नाटक करू नका, अशी टीकाही खैरे यांनी केली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा