औरंगाबाद – गेल्या महिन्यापासून सतत होणारा पाऊस आणि जागोजागी साचलेले पाणी, रस्त्यावरील खड्डे यामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था तर खूपच गंभीर झाली आहे. याचाच एक दाखला म्हणजे सोमवारी रात्री घडलेली दुर्दैवी घटना. रात्रीची वेळ आणि प्रसूती वेदना सुरु झाल्याने शिऊर बंगला येथून एक महिला तिच्या पतीसह उपचारासाठी औरंगाबादच्या दिशेने निघाली. ही महिला खासगी बसने औरंगाबादच्या दिशेने निघाली. मात्र रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. एवढा त्रास होऊनही जन्मलेले बाळ दगावले.
याविषयी अधिक माहिती अशी की, शिऊर बंगला येथील समीर शेख आणि साजिया या दाम्पत्यासाठी सोमवारची रात्र अतिशय दुःखदायक ठरली. सोमवारी औरंगाबादच्या दिशेने खासगी बसमधून हे दोघे उपचारासाठी निघाले. मात्र रस्त्यात एवढे प्रचंड खड्डे होते की, एक खड्डा चुकवता चुकवता, दुसरा बससमोर हजर व्हायचा. त्यामुळे बसचालकाने कितीही सावधगिरी बाळगली तरी गर्भवती साजियाला प्रचंड वेदना झाल्या. परिणामी बसमध्येच तिची प्रसूती झाली. रात्री 1 ते दीडच्या सुमारास माता आणि बाळाचा हा जीवनमरणाशी संघर्ष चालला. पण यात बाळाचा जीव वाचू शकला नाही. सुदैवाने माता वाचली. यावरच समाधान मानून शेख आणि त्यांच्या नातेवाईकांनी पुढील प्रवास टाळण्याचा निर्णय घेतला. कारण पुढील रस्त्यांवर अजून खड्डे असल्याने मातेला आणखी त्रास होण्याचा धोका होता.
रस्त्यांवरील खड्ड्यामुळे सदर मातेची बसमध्येच प्रसूती झाल्याने शेख यांचे नातेवाईक प्रचंड संतापले होते. मात्र पत्नी सुरक्षित असल्याने आता दवाखान्यात जाऊन काय करायचे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर होता. त्यामुळे शेख यांच्या कुटुंबियांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.