हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडमध्ये एका वकील महिलेला बेदम मारहाण केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मारहाणीत महिलेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून , काळे निळे वण पडले आहेत. एका पाठोपाठ बीडमधील गुन्हेगारी वाढत निघाली असल्यामुळे, सरकार काय झोपेचं सोंग घेत आहे का ? असा थेट प्रश्न विचारला जात आहे. तसेच या घटनेनंतरही तात्काळ गुन्हा दाखल न झाल्याने काँग्रेसने राज्य सरकारवर अन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसने सरकारवर केला हल्लाबोल –
अंबाजोगाई न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या महिला वकील ज्ञानेश्वरी आंचल यांच्यावर 10 जणांनी हल्ला केला असून , त्या महिलेला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अन माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “लाडक्या बहिणींचे वाली म्हणणारे सरकार नेमकं गुन्हा नोंदवण्यासाठी कशाची वाट पाहत होतं? गुन्हेगार पळून जावेत याचीच वाट पाहत होते का?” असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला असून , सरकारला निशाणा साधला आहे.
त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “एक महिला वकील सुरक्षित नाही, तर सामान्य महिलांचं काय? सरकारने गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सक्षम गृहखात्याची गरज आहे.”
10 जणांविरोधात गुन्हा दाखल –
या प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अनंत अंजान (सरपंच), सुधाकर अंजान, राजकुमार मुंडे, कृष्णा मुंडे, ज्ञानोबा रपकाळ, नवनाथ जाधव, मृत्यूंजय अंजान, अंकुश अंजान, सुधीर मुंडे अन नवनाथ मोरे यांचा समावेश आहे.
वकील महिलेला बेदम मारहाण –
महिला वकील ज्ञानेश्वरी आंचल यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “हे आरोपी अतिशय धोकादायक आहेत. यांना तुरुंगातून बाहेर काढू नये, अन्यथा ते मला ठार मारतील,” असा गंभीर आरोप त्यांनी केला असून, या आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.




