बाईकवरून जाणाऱ्या दाम्पत्यास घाटात अडविले, पतीला मारहाण करत महिलेसोबत केले ‘हे’ दुष्कृत्य

rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये धाडकडून बुलडाण्याकडे येणाऱ्या पती-पत्नींची दुचाकी अडवून पतीस मारहाण करून विवाहितेवर दोघांनी मिळून लैंगिक अत्याचार केला आहे. हि घटना काल रात्री 11 ते 11.30च्या दरम्यान बुलडाणा-धाड रोडवरील चिखला घाटामध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध विविध कलमान्वये ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
या प्रकरणातील पीडित महिलेने बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित महिला व तिचे पती काही कामानिमित्ताने धाड येथे सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान गेले होते. काम अटोपून रात्री दहा वाजता धाडहून बुलडाण्याकडे येत असताना रात्री ११.३०च्या सुमारास चिखला घाटाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. यानंतर त्या दोघांनी हातात दगड घेऊन पतीला बेदम मारहाण केली. यानंतर त्यांच्यातील एकाने तिच्या पतीला धरून ठेवले व दुसऱ्याने तिला रस्त्याला कडेला नेऊन तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले.

यानंतर दुसऱ्या आरोपीनेदेखील तिच्यावर अशाचप्रकारे लैंगिक अत्याचार केले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर घाबरलेल्या अवस्थेत पती-पत्नी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडिता व तिच्या पतीचा जबाब घेतला. याप्रकरणी विवाहितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या पीडित महिला आणि तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.