नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रातील उत्पादन बंद होते. यात चार चाकी गाड्यांचा देखील समावेश होता. आता मारूतीने ५० दिवसानंतर पहिली गाडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या चारचाकी गाड्यांची निर्मिती करणाऱ्या मारुती सुझुकी इंडियाने आपल्या मानेसर येथील कारखान्यातून निर्मितीचे काम सुरू केले आहे.
कंपनीने आजच हरियाणातील या कारखान्यातून कामकाज सुरू केले. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे येथील काम गेल्या ५०हून अधिक दिवसांपासून बंद होते. कंपनीने मानेसर आणि ग्रुरूग्राम येथील कारखान्यातील उत्पादन २२ मार्चपासून बंद केले होते. मारूती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितले की, मानेसर येथील प्रकल्पातून उत्पादन सुरू झाले आहे. आज मंगळवारी पहिली गाडी तयार होईल. सध्या ७५ टक्के कर्मचाऱ्यांसह एका शिफ्टमध्ये काम केले जात आहे.
दरम्यान कारखान्यात पूर्ण क्षमतेने कामकाज कधी सुरू होईल याबाबत विचारले असता. भार्गव म्हणाले, त्या बाबतचा निर्णय सरकारवर अवलंबून असेल. दोन्ही शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी, कर्मचारी संख्या वाढ आणि सप्लाय चेन कधीपर्यंत सुरू होते त्यावर गोष्टी ठरतील. गुरूग्राम प्रकल्पातील काम सुरू होईल पण त्याला अद्याप वेळ असल्याचे भार्गव यांनी सांगितले. मारूतीने काही वाहनांच्या उत्पादनाबरोबरच आपली वाहन विक्रीची शोरूम देखील उघडली आहेत. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलत दिल्यानंतर मारूतीने १ हजार ६५० गाड्यांची डिलिव्हरी केली. तर कंपनीने उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नव्या ५५० गाड्यांचे बुकिंग झाले आहे.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”