सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
महसूलमधील रिक्त पदे भरणे, दांगट समितीचा आकृतीबंद लागू करण्यासह अस्थायी पदे कायम करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद करीत आंदोलनात सहभागी झाले होते. महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय केलेला नायब तहसीलदार संवर्ग रद्द करावा, अव्वल कारकून मधून नायब तहसीलदार पदोन्नतीची प्रक्रीया पूर्ण करावी, महसूल सहाय्यकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, दांगट समितीच्या अहवालानुसार आकृतीबंद लागू करावा, संजय गांधी, निवडणूक, रो.ह.यो., पीएम किसान आदी महसूलेत्तर कामांसाठी स्वतंत्र पदे निर्माण करावीत, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचा पदोन्नती कोटा 25 टक्के वरुन 50 टक्के करावा, नवीन 27 तालुक्यात महसूलेत्तर कामांकरिता पद निर्मिती करुन पदे तातडीने भरावीत, गौणखनिज विभागात खनिकर्म निरिक्षक हे पद निर्माण करावे आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कैलास कोळेकर, सुधाकर जाधव, जयंत निरगुडे, संजय जाधव, सुनील साळुंखे आदी पदाधिकाऱ्यांसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.