World Championship of Legends 2024 Final : आज भारत VS पाकिस्तान फायनल!! 17 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । क्रिकेट रसिकांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. कारण आज भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना (IND Vs PAK Final) होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स या स्पर्धेत (World Championship of Legends 2024) दोन्ही संघानी अंतिम फेरीत धडक मारली असून आज या स्पर्धेचे विजेतेपद कोण पटकवणार याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष्य आहे. दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने आजचा सामना रोमांचक होणार यात शंका नाही. परंतु या अंतिम सामन्यामुळे १७ वर्षापूर्वीच्या इतिहासाची आठवण पुन्हा एकदा जागी झाली. कारण २००७ मध्ये T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये हेच २ संघ आमनेसामने होते आणि भारताने ती मॅच जिंकून नवा इतिहास रचला होता. याच इतिहासाची पुनरावृत्ती टीम इंडियाच्या दिग्गजांच्या संघाने करावी अशी इच्छा प्रत्येक भारतीयांची असेल.

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले खेळाडू खेळत असल्याने प्रेक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय संघात युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, सुरेश रैना, नमन ओझा, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू सारखे आक्रमक फलंदाज आहेत तर गोलंदाजी विभागात हरभजन सिंग, धवल कुलकर्णी पवन नेगी आणि विनय कुमार आहेत. आत्तापर्यंत संपूर्ण स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये तर युवराज सिंग, इरफान पठाण आणि युसूफ पठाणने वादळी खेळी करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांपासून सावध राहावं लागणार आहे.

दुसरीकडे पाकिस्तानच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, अतिशय दमदार खेळाडूंमुळे हा संघ कागदावर खूपच मजबूत दिसत आहे. युनिस खान, कामरान अकमल, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, मिस्बाह उल हक असे पाकिस्तानच्या इतिहासातील दिग्गज खेळाडू या संघात असल्याने त्यांची फलंदाजी खूपच दमदार वाटतं आहे. तर गोलंदाजीमध्येही अब्दुल रझाक, वहाब रियाज, सोहेल खान सारखे आग ओकणारे गोलंदाज पाकिस्तान कडे आहेत. दोन्ही संघ मजबूत असल्याने कोणीच कोणाला कमी नाही… त्यामुळे आजचा हा अंतिम सामना रोमहर्षक आणि क्रिकेट चाहत्यांना खुश करणारा ठरेल हे मात्र नक्की…