हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात आयसीसी वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरू झाला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा आपला पहिला सामना जिंकून विश्वचषक स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली आहे. पण समाज माध्यमातून चर्चा मात्र वेगळ्याच गोष्टींची होताना दिसत आहे. सराव सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाने भगव्या रंगाची जर्सी घातलेली दिसली आणि भारत पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया भगव्या रंगाचीच जर्सी घालणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत खरं नेमकं काय आहे हे BCCI ने स्पष्ट केलं आहे.
BCCI ने नेमकं काय म्हंटल – (World Cup 2023)
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना रविवारी पार पडला . त्यानंतर आता येत्या शनिवारी भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध असून नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. परंतु सामन्यापूर्वीच भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालणार आहे असे बोलले जात आहे.मात्र भारतीय क्रिकेट बोर्डाने या बातमीचे खंडन केलं आहे. असं काहीही होणार नाही. भारतीय संघ आपल्या नेहमीच्या निळ्या जर्सी मध्येच पाकिस्तान विरुद्धचा सामना खेळेल असं BCCI चे खजिनदार आशिष शेलार यांनी सांगितले.
आशिष शेलार यांनी म्हंटल कि, कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत (World Cup 2023) निळ्या जर्सी मध्येच खेळेल. टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध भगव्या रंगांचे पर्यायी मॅच किट देणार असल्याच्या मीडिया रिपोर्ट्स आम्ही स्पष्टपणे फेटाळून लावतो. हे वृत्त पूर्णपणे निराधार असून कोणाच्या तरी कल्पनेचे काम आहे. Men in blue ही भारताची संघाची ओळख आहे. त्यामुळे भारतीय संघ आपल्या नेहमीच्या निळ्या जर्सी मध्येच खेळेल असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.