मुंबई | २७ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर पर्यटनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली. प्रत्येक वर्षी एक विशिष्ट मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे.
‘टूरिझम अँड डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन’ म्हणजेच ‘पर्यटन आणि डिजिटल क्रांती’ ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. पर्यटन हा व्यवसाय उद्योजकतेला चालना देणारा असून, या उद्यमशीलतेला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल, यावर या निमित्ताने मंथन होणे अपेक्षित मानले गेले आहे.
या व्यवसायात बिग डाटा, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आदी विकसित करण्याच्या दृष्टीने पर्यटनाशी संबंधित सर्व व्यावसयिकांनी जागरूक व्हावे, अशी यामागील भूमिका आहे. पर्यटनाचे महत्त्व आणि लोकप्रियता विचारात घेऊन १९८० मध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाने घेतला.