मुंबईत महिलेला चिरडणारी ‘ती’ कार शिंदे गटाच्या उपनेत्याची; पोलीस तपासात मोठी अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वरळी येथे आज भल्या पहाटे एका कोळी दाम्पत्याला कारने उडवलं. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती जखमी झाला. आता या प्रकरणी (Worli Hit And Run Case) एक महत्वाची माहिती समोर येत आहे. सदर दुचाकीला धडक देणारी कार शिंदेसेनेच्या उपनेत्याची असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांची ती गाडी असून त्यांचा मुलगा मिहीर शाह (Mihir Shah) हा त्यावेळी गाडी चालवत होता. सध्या पोलिसांकडून राजेश शाह याना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता पोलीस महिरीच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेत आहेत.

आज पहाटे ५ वाजून ३० मिनीटांनी अपघात झाला त्यावेळी शहा, त्यांचा मुलगा मिहीर आणि चालक कारमध्ये होते. कारच्या ड्रायव्हिंग सीटवर मिहीर शहा होता.त्याच वेळी कारनं वरळीच्या ऍट्रिया मॉलजवळ एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवर एक कोळी दाम्पत्य होतं. ससून डॉकवरुन मासळी खरेदी करुन ते घरी परतत होते. त्यावेळी कारनं त्यांना मागून धडक दिली. दोघेही कारच्या बोनेटवर पडले. यावेळी नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. त्यातच भर म्हणजे अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार न थांबवता तशीच पुढे चालवत महिलेला फरफटत नेलं. यात महिलेचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या आरोपी मिहीरनं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्यानं गोरेगावला राहत असलेल्या गर्लफ्रेंडचं घर गाठल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अपघातावेळी मिहीर कार चालवत असल्याचा जबाब जखमीनं दिला आहे. तर राजेश शहांनी मात्र वेगळी माहिती दिली. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी चालक गाडी चालवत होता असं राजेश शाह यांनी सांगितले आहे. आता हे प्रकरण ड्रंक अँड ड्राईव्हचे तर नाही ना, यादृष्टीने पण पोलिसांनी तपास करत आहेत. विशेष म्हणजे मागील महिन्यात पुण्यात सुद्धा असाच प्रकार घडला होता. ती घटना अजूनही ताजी असताना आता मुंबईत पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे.