… तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल; सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला पोलिसांनी तीन दिवसांनी अटक केली. मिहीर शाहाचे वडील राजेश शाहा (Mihir Shah) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेना गटाचे उपनेते आहेत. त्यामुळे अपघाताला राजकीय वळण लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे ‘मिंधे सरकार’ म्हणजे गुन्हेगारांनी गुन्हेगारांना वाचविण्यासाठी चालविलेले सरकार आहे, याविषयी आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. पोलिसांनी मिहीर शाहच्या फाशीची मागणी न्यायालयात करायला हवी तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल असं सामना अग्रलेखात म्हंटल आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

महाराष्ट्राचे ‘मिंधे सरकार’ म्हणजे गुन्हेगारांनी गुन्हेगारांना वाचविण्यासाठी चालविलेले सरकार आहे, याविषयी आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. गुन्हेगार निर्ढावले आहेत व त्यांना कायद्याची भीती अजिबात राहिलेली नाही. पोलीस आयुक्त, फौजदार फक्त गणवेश घालण्यापुरतेच उरलेले आहेत आणि राज्याच्या गृहमंत्र्यांची अवस्था एखाद्या बुजगावण्यासारखी झाली आहे. वरळी ‘हिट ॲण्ड रन’ गुन्हय़ातील आरोपी मिहीर शहाला मुंबई पोलिसांनी तीन दिवसांनी अटक केली. मिहीर शाहाने एका निरपराध महिलेची भररस्त्यावर हत्या केली आहे. नशेच्या अंमलाखाली त्याने आलिशान गाडी भरधाव चालवून कावेरी नाखवा यांचा निर्घृण पद्धतीने बळी घेतला. कावेरी नाखवांना शंभर मीटरपर्यंत फरफटत नेले. नाखवा यांचे पतीही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी मिहीर शहा पळून गेला. मिहीरच्या बापाचे राजकीय वजन आहे व तो थेट मुख्यमंत्र्यांच्या आतल्या गोटातला हस्तक असल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव हा असायलाच हवा. पोलिसांनी मिहीरला त्वरित पकडले असते तर वैद्यकीय चाचणीत त्याने नशा केल्याचे सिद्ध झाले असते. पण तीन दिवसांनी आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे त्याची नशेखोरी पोलीस सिद्ध करू शकतील काय? अर्थात जुहूतील एका पबमध्ये या मिहीरने दारू ढोसली व तो ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचे सीसी टीव्ही फुटेज समोर आले आहे.

मिहीर शहा याने एका निरपराध महिलेस चिरडून मारले. हा अनवधानाने घडलेला अपघात नसून आरोपीने दारू पिऊन केलेला सदोष मनुष्यवध आहे. बिघडलेल्या बापजाद्यांची ही बिघडलेली कार्टी रस्त्यावरील सामान्य माणसांना किडय़ामुंग्यांसारखी चिरडून पुढे जातात व आपल्या गाडीखाली कोणी तरी जिवाच्या आकांताने तडफडतो आहे याचे भानही त्यांना नसते. अशा प्रकरणातले आरोपी जामिनावर सुटतात व पुढे या खटल्यांचे काय होते ते कधीच कुणाला कळत नाही. भररस्त्यावर एका महिलेचा केलेला खून पचवून ढेकर द्यायची क्षमता आरोपी मिहीर शहा व त्यांच्या कुटुंबात आहे. आरोपीच्या पिताश्रींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यामुळेच तो मुख्यमंत्र्यांच्या आतल्या गोटात वावरतो. मुख्यमंत्री व त्यांच्या कार्यालयातून पोलीस स्टेशनला सरळ फोन जातात व समर्थक गुन्हेगारांना वाचवा अशा सूचना केल्या जातात. आता म्हणे या राजेश शहा नावाच्या ‘महात्म्या’ला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षातून काढून टाकले आहे. गुन्हा एवढा ढळढळीत असताना या महाशयांना पक्षातून काढण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी 60 तास घेतले. महाराष्ट्राचे सरकार हे केवळ श्रीमंत व गुन्हेगारांसाठीच काम करत आहे. तसे नसते तर कावेरी नाखवा यांचा खून करणाऱ्या मिहीर शहाच्या बापाला जामीन मिळालाच नसता. या राजेश शहाने आपल्या खुनी पोराला पळून जाण्यासाठी मदत केली व पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरीही खुन्याचा बाप जामिनावर सुटतो हा चमत्कार मिंधे सरकारमध्येच घडू शकतो. मृत कावेरी नाखवा यांची मुलगी व पतीचा आक्रोश बधिर सरकारपर्यंत पोहोचेल काय?

कावेरी नाखवा यांचे पती सांगतात, “अपघात झाला तेव्हा मी आरोपीला गाडी थांबविण्याची विनवणी करीत होतो. मी त्याच्या गाडीच्या बोनेटवर जोरात हात आपटला तरीही त्याने गाडी थांबवली नाही व तो माझ्या पत्नीला तसाच फरफटत पुढे घेऊन गेला. गरीबांना या जगात कोणी वाली नाही.” कावेरीचे पती प्रदीप नाखवा यांचा हा आकांत आहे. मुख्यमंत्री राजकीय फायद्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेचे ढोल वाजवीत फिरत आहेत. पण त्यांच्याच आतल्या गोटातील गुन्हेगाराने कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीची हत्या केली. तिला चिरडून मारले व आता बहिणीच्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वरळीच्या ‘हिट ॲण्ड रन’ घटनेने मुंबईच्या रस्त्यावर माणुसकी चिरडून मेली. मुंबईतील धनाढय़ांना जणू संवेदनाच उरलेली नाही. या घटनेतील मृत कावेरी नाखवा या प्रख्यात मराठी कलावंत जयवंत वाडकर यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. आरोपीस वाचवण्यासाठी प्रकरण मॅनेज होतेय असा आरोप वाडकर यांनीही केला आहे. मात्र अशा प्रसंगी मुंबईतील मराठी नटनटय़ा मंडळही गप्पच बसून राहते. मिंधे सरकारला जाब विचारण्याची हिंमत कुणात दिसत नाही, कारण सगळेच मिंधे झाले आहेत. कुणाला बक्षिसे, कुणाला बिदाग्या दिल्या गेल्या असल्याने त्यांच्या ओझ्याखाली कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीच्या किंकाळया विरून गेल्या. आरोपी मिहीर शहाचा गुन्हा हा सदोष मनुष्यवधाचा आहे. पोलिसांनी त्याच्या फाशीची मागणी न्यायालयात करायला हवी तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल असं म्हणत ठाकरे गटाने शिंदेंवर निशाणा साधला आहे.