औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या उद्रेकामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत नसली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपूरी पडत आहे. आजघडीला शहरात 235 व्हेंटिलेटर बेडपैकी एकही बेड शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी समोर आली. या परिस्थितीमुळे सुविधेअभावी रुग्णांचा मृत्युदर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात 13 मोठे रुग्णालये (डीएचसी), 56 डीसीएचसी आणि 17 कोविड केअर सेंटर्स आहेत. यामध्ये एकूण बेड्सची संख्या 7 हजार 826 इतकी असून त्यामध्ये व्हेंटिलेटरचे 235 बेड्स, आयसीयूचे 664 बेड्स, नॉन आयसीयूचे 2179 बेड्स आणि आयसोलेशनचे 4748 बेड्स आहेत. त्यापैकी व्हेंटिलेटरचे 235, आयसीयूचे 612, नॉन आयसीयूचे 1740 आणि आयसोलेशनचे 2812 बेड रुग्णांनी व्यापले आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक राहिलेला नसून आयसीयूचे केवळ 52 बेड रिकामे आहेत. अशा परिस्थितीत गंभीर रुग्ण झाल्यास त्यास व्हेंटिलेटर मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे आरोग्य सुविधांची कमतरता लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तुटवड्याबाबत लोकप्रतिनिधी चिंतित : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत रेमडेसिवीर, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली. जिल्ह्यातील उपलब्ध ऑक्सिजन इतर जिल्ह्यात निर्यात करु नये, याबाबत खा. डॉ. कराड यांनी भूमिका मांडली. खा. इम्तियाज जलील यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अधिक साठ्याबाबत विचारणा केली. आ. हरीभाऊ बागडे व आ. अतुल सावे यांनी ऑक्सिजनची आवश्यकता असणार्या रुग्णांनाच रेमडेसिवीर देण्याचे सूचित केले. खाजगी रुग्णालयात आकारण्यात येणार्या अवाजवी बिलावर निर्बंध घालण्याची मागणी आ. संजय शिरसाठ यांनी केली. रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकार्यांच्या निगराणीखाली वितरीत करण्याचे आ. अंबादास दानवे यांनी सुचविले.