सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दिले कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाने म्हणजेच डेबू राजन खान याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सोमवारी पुण्यातील सोमटने फाटाच्या शिंदे वस्ती परिसरात असणाऱ्या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन डेबू याने आपले जिवन संपवले आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी डेबू राजन खानने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे, डेबू खानने आत्महत्या पूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगितले आहे.

लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू राजन खान IT अभियंता होता. तो सोमटने फाटा येथील परिसरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. मात्र सोमवारी डेबूने दार उघडले नसल्यामुळे घर मालकिणीने डेबूच्या भावाशी संपर्क साधला. यानंतर भावाने देखील डेबूला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा देखील कोणताच रिस्पॉन्स न आल्यामुळे डेबूचा भाव तातडीनं घटनास्थळी दाखल झाला. यावेळी त्याच्या भावाने दरवाजा वाजवण्याचा , डेबूला आवाज देण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्याने पोलिसांशी संपर्क साधून या सर्व घटनेची माहिती दिली.

तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घराचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना बेडरूममधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचे दिसून आले. तसेच त्यांना, आत्महत्येपूर्वी डेबूने लिहून ठेवलेली चिठ्ठी देखील सापडली. या चिट्टीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डेबूने आर्थिक व्यवहारात फटका बसल्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. सध्या या सर्व घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच, या आर्थिक व्यवहारात कोणाचा संबंध होता याचा शोध पोलीस घेत आहेत.