सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वर पर्यंत मिनी ट्रेन / टॉय ट्रेन सुरू करावी आणि साताऱ्याचे पर्यटन, रोजगार वाढवावे अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कास ते बामणोली हा रस्ता 18 किलोमीटर आहे. कास तलावाचा परीघ जवळ जवळ 7 किलोमीटरचा आहे. कास ते महाबळेश्वर हा रस्ता 40 किलोमीटर आहे. साताऱ्याच्या पर्यटनास चालना मिळावी. यासाठी यवतेश्वर पठार या ठिकाणी सर्व वाहने पार्क करून यावतेश्वर पठार पासून कास फाटा मार्गे महाबळेश्वर या अंतरासाठी माथेरान प्रमाणे मिनी ट्रेन / टॉय ट्रेन चालू करावी.
या भागात मिनी ट्रेन / टॉय ट्रेन चालू झाल्यामुळे
हजारो वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होईल, निसर्गाच्या विविधतेचा आस्वाद सर्वाना घेता येईल. महाबळेश्वर पर्यंत मिनी ट्रेन / टॉय ट्रेन गेल्यामुळे तेथील पर्यटक सुद्धा या भागात येऊन येथील पर्यटन आणि साधन संपत्तीत वाढ होईल. या भागातील लोकांना रोजगार उत्पन्न होईल.
एक नवीन स्वस्त साधन निर्माण झाल्याने कास कडे पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन वाढून लोक आकर्षीत होतील. मिनी ट्रेन / टॉय ट्रेन मुळे ” कास पुष्प” पठारावरील , गाड्यांच्या प्रदूषणामुळे नष्ट होणाऱ्या फुलांच्या जाती वाचतील. 12 महिने ही मिनी ट्रेन / टॉय ट्रेन चालू शकेल, यातील 9 महिने पर्यटक मोठ्या संख्येने उपयोग करतील. काही ठिकाणी प्रेक्षा गॅलरी उभारल्याने पर्यटक त्या ठिकाणी थोडा वेळ थांबून निसर्ग सौन्दर्याचा लांबूनच आस्वाद घेतील. तसेच या ठिकाणी स्नॅक्स सेंटर्स उभारल्याने त्यांना सातारी चव अनुभवण्यास मिळेल आणि स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होतील.
सदरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हीच मिनी ट्रेन / टॉय ट्रेन पर्यटकांच्या सोयीसाठी कास तलावाच्या भोवती फिरवली जाऊ शकते. ही ट्रेन कास तलावाभोवती फिरवताना कोणतीही जंगलतोड किंवा पर्यावरणाची हानी न करता, पिलर्स वरून फिरवली जाऊ शकते.
यासंकल्पनेतून या परिसरात वाढणारे पर्यटन, प्रदूषण मुक्ती आणि वाढणारे रोजगार या सर्वांचा विचार करून, यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वर या मार्गावर मिनी ट्रेन / टॉय ट्रेन सुरू सुरु करून मिळावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात हा प्रयोग पूर्ण ताकतीने राबवून पर्यटन विकासासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली. या मागणीला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या प्रकल्प बाबत पूर्ण माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकारी सातारा रुचेश जयवांशी यांनीही या बाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संबंधित विभागांची बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.
या विषयासाठी 2018 पासून पाठपुरावा चालू आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती पुढील परवानग्या आणि कार्यवाहीसाठी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, पर्यटनमंत्री मंगल प्रसाद लोढा यांच्याकडे पाठवण्यात आल्या असल्याचे विकास गोसावी यांनी सांगितले. या वेळी जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, नगरसेवक धनंजय जांभळे उपस्थित होते.