हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यवतमाळ जिल्हयात एका साहायक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यातच फाशी घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यवतमाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले साहायक पोलीस उपनिरीक्षक राजू उईके यांनी काल रात्री उशिरा फाशी घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी रात्री १ वाजेपर्यंत ते कामावर होते. रात्री उशिरापर्यंत ते आपल्या कक्षात बसून होते. सकाळी काही पोलीस शिपाई त्यांच्या कक्षात गेले तेव्हा त्यांना उईके फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सोयरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी त्वरित पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. दरम्यान, राजू उईके यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत चर्चाना उधाण आलं आहे. कामाचा ताणाबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राच्या कारणावरून ते गेल्या काही दिवसांपासून काळजीत होते, अशी दबक्या स्वरात चर्चा यवतमाळमधील पोलीस वर्तुळात सुरु आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.