येडेमच्छिंद्र ते कराड काॅंग्रेसची रॅली : “संविधान बचाव, भाजप हटाव” साठी 3 डिसेंबरला पदयात्रा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर 2022 रोजी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत पदयात्रा निघणार आहे. यामध्ये प्रामुख्याने “संविधान बचाव, भाजप हटाव” चा नारा पदयात्रेत देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांनी सांगितले. कराड येथील सांगता सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डाॅ. वजाहत मिर्झा हे उपस्थित राहणार आहेत.

येडेमच्छिंद्र ते कराड दरम्यान 25 किलोमीटर संविधान बचाव पदयात्रेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अोबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सचिव प्रदीप जाधव, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, तालुकाध्यक्ष विद्याताई थोरवडे यांच्यासह काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भानुदास माळी म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरूवात कराडमधून होत आहे. या यात्रेला सातारा व सांगली जिल्ह्यातील हजारो लोक सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेसांसह अन्य सामाजिक व राजकीय संघटना यात्रेत सहभागी होणार आहेत. अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी प्रास्ताविक केले. अशोकराव पाटील यांनी आभार मानले.