होय, मीच गाडी चालवत होतो; आरोपी मिहीर शाहची पोलिसांसमोर कबुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वरळी हिट अँड रन (Mumbai Hit And Run) प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी मीच गाडी चालवत होतो, मात्र मी कोणतीही नशा केली नव्हती. मी घाबरलो होतो त्यामुळे वडिल राजेश शहा हे घटनास्थळावर पोहोचण्याआधीच फरार झालो होतो अशी कबुली मिहीर शाह (Mihir Shah) याने पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिली. पोलिस सूत्रांनुसार, या प्रकरणी पोलिसांनी Culpable homicideचा केस दाखल केली आहे.

मंगळवारी मिहीर शाहला पोलिसांनी तब्बल 60 तासांनंतर विरारमधील एका हॉटेलमधून अटक केली. आरोपी मिहिरच्या मित्राने त्याचा फोन ऑन केल्यानंतर पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले. आज दुपारी मिहीरला कोर्टात सादर करण्यात येणार आहेत. पोलिस पुढील तपासासाठी आरोपीची कस्टडीची मागणी करण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मिहीरचे वडील शिवसेना नेते राजेश शहा यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यांना दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला आहे.

दरम्यान, या एकूण सर्व प्रकारानंतर शिंदे गटाला उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं आहे. शिंदे गटाने मिहीर शाहचे वडील राजेश शहा यांच्यावर कारवाई केली आहे. राजेश शहा यांची उपनेतेपदी पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेश शहा हे पालघर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. राजेश शाह यांच्यावर आरोपीला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रविवारी सकाळी वरळी परिसरातील अट्रिया मॉलजवळ एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवर असलेल्या मच्छिमार दाम्पत्याला उडवले. दोघेही कारच्या बोनेटवर पडले. यावेळी नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. त्यातच भर म्हणजे अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार न थांबवता तशीच पुढे चालवत महिलेला फरफटत नेलं. यात महिलेचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या आरोपी मिहीरनं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्यानं गोरेगावला राहत असलेल्या गर्लफ्रेंडचं घर गाठल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अपघातावेळी मिहीर कार चालवत असल्याचा जबाब जखमीनं दिला होता.