हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांदा उत्पादनात नेहमी आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचं करायच काय? हा प्रश्न पडला आहे. लाल कांदा सध्या बाजारामध्ये येऊ लागला असल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. अशा अवस्थेत हतबल झालेल्या नाशिकमधील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहले आहे.
सततच्या घसरत चाललेल्या भावामुळे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही. अशा अवस्थेत सरकारला जाग आणण्यासाठी येवल्याच्या नगरसुल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी थेट आपल्या रक्ताने पत्र लिहिले असून कांदा अग्निडाग समारंभाचे आमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
येवला येथील शेतकरी कृष्णा डोंगरे याने कांदा अग्निडाग समारंभाचे आयोजन केले आहे. याची निमंत्रण पत्रिका मुख्यमंत्र्याना दिली असल्याने ती मुख्यमंत्र्यांच्या नावे व्हायरल होत आहे. डोंगरे यांनी लिहलेल्या या पत्राची चांगलीच चर्चा सध्या नाशिकमध्ये होत आहे. आता या कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहणार कि नाही? तसेच काय उत्तर देणार? हे पहावे लागणार आहे.
काय लिहलेय निमंत्रण पत्रिकेत?
शेतकरी कृष्णा डोंगरे याने मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून म्हटले आहे की, शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असताना त्याला कांदा रडवतो आहे. कांदा एवढ्या कमी दरात जात असल्याने उत्पादन खर्च वसूल होत नसून केंद्रातील भाजपाचे धोरण शेतकरीविरोधी आहे. आपण शेतकऱ्याचे पुत्र असून या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. मात्र आपणही गप्प का? आपण काही करु शकत नसाल तर आयोजित केलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कांद्यानं आणलं पुन्हा डोळ्यात पाणी; बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले; बळीराजामध्ये संताप
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनाही दिलं निमंत्रण
नाशिकमध्ये कांद्याला भाव मिळत नसल्याने कृष्णा डोंगरे याने येत्या 6 मार्च रोजी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील निमंत्रण दिले आहे. येवला तालुक्यातील नगरसूल जवळील मातुलठाण या गावी समारंभाचे ठिकाण आहे. सदर कार्यक्रमाच्या जाहीर निमंत्रण पत्रिका छापल्या असून सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहेत.