हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील गटग्रामपंचायत खैरी-वलमाझरीने गावकऱ्यांसाठी एक आगळावेगळा अन आकर्षक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांमध्ये कर भरण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने घेण्यात आलेल्या या निर्णयाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. वलमाझरी ग्रामपंचायतीच्या 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या मासिक सभेत सन 2025-26 च्या घरकर व पाणीपट्टी कर भरणाऱ्या लाभार्थ्यांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याला नागपूर ते हैदराबाद विमानप्रवास, राहण्याची व्यवस्था अन हैदराबादहून परतीसाठी एसी रेल्वे प्रवासाची संधी देण्यात येणार आहे.
लकी ड्रॉमध्ये इतर बक्षिसांमध्ये –
द्वितीय क्रमांक – 100 किलो ‘जय श्रीराम’ ब्रँड तांदूळ
तृतीय क्रमांक – कुटुंबातील 5 सदस्यांसाठी अभयारण्य सफारी
चौथा क्रमांक – 20 किलो तुरीची डाळ
पाचवा क्रमांक – एक टिन खाद्यतेल
सहावा क्रमांक – एक चांदीचा शिक्का
याशिवाय, 15 मे 2025 पूर्वी सर्व कर भरणाऱ्या कुटुंबांना मोफत पिठ दळण्याची सुविधा अन आरोच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
आगळा वेगळा उपक्रम –
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे खैरी, वलमाझरी, पिटेझरी अन आमगाव या चारही गावांतील ग्रामस्थांमध्ये कर भरण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. गावातील स्वच्छता, पर्यावरणसंवर्धन व कचऱ्यापासून खतनिर्मिती या बाबतीत आधीच पुरस्कारप्राप्त असलेल्या ग्रामपंचायतीने या अभिनव उपक्रमाद्वारे गाव विकासात एक नवा अध्याय सुरू केला आहे. यामुळे ग्रामपंचायतच्या सरपंचाचे सर्वत्र कौतूक होत आहे. गावकऱ्यांचा प्रतिसाद पाहता ही योजना इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरू शकते.




