बेपत्ता झालेल्या युवकाचा अंकली मध्ये सापडला मृतदेह

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे

 तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून पत्नीची छेड काढत असल्याच्या रागातूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बाळू उर्फ विकी मलमे असे त्या मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मयत बाळू हा दिनांक १३ रोजी सकाळी बेपत्ता झाला होता. त्याच्या घरच्यांनी त्याचा बराच शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेरीस त्याचा भाऊ अतुल याने आपला भाऊ बेपत्ता असल्याची फिर्याद सांगली ग्रामीण पोलिसांत दिली होती. त्यानुसार पोलिसांनी बाळूचा शोध सुरु केला.

आज दुपारी अंकलीतील पापा पाटील यांच्या शेतात एकाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला. सदर मृतदेह बाळूचा असल्याचे निष्पन्न झाले. मयत बाळूचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. मिळालेल्या माहितीनुसार घटनेपूर्वी मयत बाळू, पवन मलमे आणि किरण मलमे या तिघांनी धामणीत एके ठिकाणी मद्यप्राशन केले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. यानंतर किरण व पवन यांनी त्याला दुचाकीवरून जवळच असणाऱ्या एका शेतात नेले. त्याठिकाणी त्याचा गळा दाबून खून केल्यानंतर ते दोघेजण पसार झाले. बाळूला दुचाकीवरून नेतांना काही जणांनी पहिले असल्याचेही समजते. मयत बाळू हा संशयित किरणच्या पत्नीची छेड काढत होता. याबाबत किरणने त्याला समजावून सांगितले होते. तरीही तो ऐकत नव्हता. बाळू हा सेंट्रिंग काम करीत होता.

याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी किरण मलमे यास ताब्यात घेतले आहे. बाळूच्या मृतदेहाची सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तरिय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यातील दुसरा संशयित पवन हा अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.