विरार : हॅलो महाराष्ट्र – मुंबईजवळील विरारमध्ये भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये एका 35 वर्षीय तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात संबंधित तरुणाला चार गोळ्या लागल्या असून तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. विरारमध्ये भरदिवसा हा गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी शिवसेना नेत्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. समय चौहान असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत समय हे एक व्यापारी असून फर्निचर आणि बाजार भरवण्याचे काम करत होते. घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी समय चौहान हा मनवेल पाडा येथून आपल्या घराकडे निघाला होता. घराच्या दिशेनं जात असताना अचानक आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात मृत समयला चार गोळ्या लागल्या आणि तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.
यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळ्या लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी एका शिवसेना नेत्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुदेश चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना नेत्याचे नाव असून ते माजी नगरसेवक आणि वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती देखील आहेत. हल्लेखोरांनी ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली हे अजून समजू शकलेले नाही. मृत समय चौहान हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती होता. त्याच्यावर यापूर्वी एक हत्येचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विरार पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.