हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मध्यंतरी राज्यात बीड (Beed) जिल्हा हा हत्या प्रकरणामुळे सर्वात जास्त चर्चेत राहिला आहे. आता याच बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) यांच्या संबंधित बातम्या मोबाईलवर पाहिल्या म्हणून एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार बीडच्या धारूर गावात घडला असून संबंधित तरुणाला मारहाण करण्यात आल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आता धारूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले??
या हल्ल्यामुळे अशोक मोहिते गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. महत्वाचे म्हणजे, या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा जातीय तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सध्या बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे.
संबंधित तरुण अशोक शंकर मोहिते हा आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहत होता. त्याचवेळी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप त्याच्याजवळ आले आणि “वाल्मिक अण्णाच्या बातम्या का पाहतोस?” असा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर या दोघांनी लाथाबुक्क्यांनी आणि हातात आलेल्या वस्तूंनी अशोक मोहिते याला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर “यापुढे जर मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णाच्या बातम्या पाहिल्यास तर तुझीही संतोष देशमुखसारखी अवस्था करू,” अशी धमकी या दोन तरुणांनी अशोकला दिली.
कृष्णा आंधळे अद्याप फरार
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले असले तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सध्या विशेष तपास पथक (एसआयटी) आणि गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) या प्रकरणाचा तपास करत आहेत. परंतु या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.