मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुनील कावळे (वय 45) असे या तरुणाचे नाव असून त्याने मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.

फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुनील कावळे याने आत्महत्या केली आहे. सुनीलकडे पोलिसांना एक बॅग सापडली असून त्यात पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये सुनीलने शेवटी सगळ्यांची माफी देखील मागितली आहे. आता सुनीलने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे राज्यातील वातावरण पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुनील कावळे हा मुळाचा अंबड तालुक्यातील आहे. सध्या सुनीलने आत्महत्या केल्यानंतर त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, सुनील कावळे या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. सुनीलने आत्महत्या पूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ज्यात त्याने मराठा आरक्षण आंदोलनाकरिता मराठा समाजातील लोकांनी 24  ऑक्टोबरला मुंबईमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सर्वांची माफी मागितली आहे. मुख्य म्हणजे, मराठा आरक्षणासाठी सुनीलने केलेल्या आत्महत्यामुळे मराठा बांधवांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे. या संपूर्ण घटनेनंतर, “मराठा युवकांनी जीवन संपवू नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे” असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिला आहे.