कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गोरगरिंबाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. काॅंग्रेसचे नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना 2015 सालापासून चाैकशी सुरू आहे. ईडी, सीबीआयला योग्य सहकार्य केले जात असतानाही 12- 12 तास बसवून चाैकशी केली जात आहे. यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करीत गांधी घराण्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. गांधी परिवाराने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले ते देश कधी विसरणार नाही. केंद्र सरकारकडून ईडी तसेच अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. मोदी सरकार विरोधात आरपारची लढाई करण्यासाठी युवक काॅंग्रेस सक्षम असल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले.
कराड तालुका युवक काँग्रेसने गुरुवारी सकाळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अमित जाधव, कराड दक्षिण अध्यक्ष दिग्वीजय पाटील, एनएसआयुचे जिल्हाध्यक्ष रोहित झांझुर्णे, कराड उत्तर अध्यक्ष शिवराज पवार, दिग्वीजय सुर्यवंशी, राहूल पवार, जितेंद्र यादव, विक्रम पाटील, नितीन पाटील, मुकुंद पाटील, मयूर पाटील, देवदास माने, गणेश सातारकर, जयवर्धन देशमुख, सुहास थोरात, राम मोहिते, सुनिल पाटील, अनिल माळी, शरद पाटील, प्रशांत यादव, विवेक चव्हाण यांच्यासह आलेल्या निषेध मोर्चात कराड तालुका युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोल्हापूर नाका येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरात निषेध मोर्चाची सांगता झाली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.