हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मुलांच्या लग्नाचा विषय खूपच अवघड झाला आहे. एकीकडे मुलांना चांगली नोकरी लागेना, तर दुसरीकडे मुलींच्या अपेक्षा मात्र डोंगराएवढ्या वाढल्यात. मुलींना चांगली नोकरी, बंगला, गाडी, मुंबई- पुण्यात फ्लॅट असणारा नवरा पाहिजे. मुलींच्या या मागणीमुळे अनेक तरुण अजूनही बिन लग्नाची राहिली आहेत. लग्नच होत नसल्याने समाजात या तरुणांची मान शरमेने खाली जातेय, त्यांची चारचौघात थट्टा केली जातेय. परिणामी तरुण मुले नैराश्यात जातायत. अशातच आता लग्न ठरेना म्हणून एका तरुणाने थेट राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार याना पत्र लिहिले आहे. साहेब, माझं लग्न जमेना, मला एक पत्नी मिळवून द्या मी तुमचे उपकार विसरणार नाही, असे या तरुणाने पत्रात लिहले आहे.
काय आहे तरुणाचे पत्र ?
या तरुणाने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात त्याला एकाकीपणा जाणवत आहे. “मी गरीब कुटुंबातून आहे. सामाजिक बंधनं आणि परिस्थितीमुळे कोणीच आपली मुलगी द्यायला तयार नाही. पण मला संसार हवा आहे, आपलेपणा हवा आहे. माझे वय वाढतेय. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करुन मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही मी राहायला तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी मी देतो. मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी विसरणार नाही, अशा आशयाचे पत्र या तरुणाने शरद पवारांना लिहले आहे.
पवार गटाकडून प्रतिक्रिया-
या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हंटल कि, अकोला येथील कार्यक्रमात हे पत्र त्या तरुणाने पवार साहेबाना दिले. यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या पक्षाची मिटिंग होती, त्यावेळी हे पत्र जयंत पाटलांच्या हातात देऊन वाचायला सांगितलं. आज ग्रामीण भागात मुलांना मुली मिळत नाहीत कारण मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुली चांगलं शिक्षण घेऊन शहरात येतात, त्यामुळे त्यांना शहरातील मुलगा हवा असतो. दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये बेरोजगारांची समस्या आहे, त्यामुळे त्या मुलाने अशा प्रकारचे पत्र शरद पवार साहेबाना दिले. या पत्रानंतर पवार साहेबानी आम्हाला सांगितलं कि त्या मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करा अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.




