होतकरु युवकांच्या स्वप्नांना आधार आणि दिशा देणारा – निर्माण युथ फ्लरीशिंग कार्यक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

युवांच्या विकासासंबंधीचा आपल्याकडील बहुतांश संवाद व चर्चा ही आत्महत्या, बेरोजगारी, अपघात, लैंगिक अत्याचार, मादक पदार्थांचे व्यसन याभोवतीच घोळते. यापलीकडे जाऊन निर्माणने गेल्या १४ वर्षात हजारो युवकांसोबत केलेल्या कामातून आणि अनुभवातून झालेल्या निरीक्षणांवर तसेच नवीनतम विज्ञानावर आधारलेले भारतातील युवांसाठी प्रथमच एक ‘निर्माण युथ फ्लरीशिंग फ्रेमवर्क’ तयार केले आहे. सध्यस्थितीत भारताची 22% लोकसंख्या ही ‘युवा’ (वय 18 – 29 वर्षे) या गटात आहे. आवाका समजून घ्यायचा तर भारताचे हे 26 कोटी युवा हे आख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहून जास्त आहेत. अर्थातच युवा हा भारताचा चेहरा, ताकद व भविष्य आहे.

दुर्दैवाने आपल्याकडे युवांच्या विकसनासाठी फारसे काही केले जात नाही आहे. शासन व खाजगी क्षेत्राचा युवांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा निव्वळ मतदार वा संभाव्य ग्राहक यापुरता सीमित असतो. सामाजिक क्षेत्रात देखील बहुतांश वेळा ‘युथ डेव्हलपमेंट’ हा तुलनेने गौण महत्त्वाचा विषय मानला जातो. युवांच्या विकासासाठी आपल्याकडे फारसे जोमदार उपक्रम तर नाहीतच पण अत्यंत महत्त्वाची एक समस्या म्हणजे यासाठीचे कुठलेही सिद्धांतन वा प्रारूप देखील भारतात नाही. त्यामुळे एखाद्या युवाचा सुयोग्य विकास म्हणजे नेमकं काय, तो होतो आहे किंवा नाही, त्याची विविधांगी सक्षम जडणघडण होते आहे की नाही, हे कसे ओळखायचे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात व अस्पष्टता राहते.

या संदिग्धतेचा परिणाम असा होतो की मग निव्वळ सहजरीत्या दृष्यमान (दर्शनीय!) आणि विनासायास मोजता येण्यासारखे असे जे विकासाचे मापक असतात उदा. परीक्षेतील मार्क्स, नोकरी असणे, पगार, घर वा गाडी असणे, इ. त्यांनाच प्राधान्य मिळते. आणि जणु याच बाबी म्हणजे युवा विकासाचे मापदंड व मानदंड आहेत असा समज प्रस्थापित होतो. त्यांचेदेखील काही महत्त्व आहे हे निर्लक्षून चालणार नाही पण ही मानके म्हणजेच परिपूर्ण असेदेखील मानता येणार नाही. मग असे इतर काय घटक, लक्षणे, वैशिष्ट्ये असू शकतात ज्यावरून याची कल्पना येईल की एखाद्या युवाचे जीवनात खरोखर छान सुरु आहे, तो किंवा ती “फ्लरिश” होत आहे, युवा विविधांगाने बहरताहेत आणि विकासाच्या / वाढीच्या मार्गावर इष्टतम स्थितीत आहेत? यासाठीचे काही बुद्धीगम्य आणि सैध्दांतिक प्रारूप नसेल तर सखोल समज देखील शक्य नाही आणि परिणामकारक उपक्रमांची कल्पना सुचणे वा ते प्रत्यक्षात आणणे हे देखील अवघड!

युवांच्या विकासासंबंधीचा आपल्याकडील बहुतांश संवाद व चर्चा ही आत्महत्या, बेरोजगारी, अपघात, लैंगिक अत्याचार, मादक पदार्थांचे व्यसन याभोवतीच घोळते. यापलीकडे जाऊन निर्माणने भारतातील युवांसाठी प्रथमच असे एक “निर्माण युथ फ्लरीशिंग फ्रेमवर्क” तयार केले आहे. हे प्रारूप गेल्या 14 वर्षात हजारो युवकांसोबत केलेल्या आमच्या कामातून आणि अनुभवातून झालेल्या निरीक्षणांवर तसेच या विषयाबाबतच्या नवीनतम विज्ञानावर आधारलेले असे आहे. या फ्रेमवर्कची व्याप्ती ही व्यापक असून त्यात 7 मुख्य विभाग आणि त्यामध्ये एकूण 50 विविध घटक अशी विभागणी केलेली आहे.
यातील 7 मुख्य विभाग खालीलप्रमाणे आहेत:
1. शारीरिक स्वास्थ्य Physical Health
2. मानसिक स्वास्थ्य Psychological Well-Being
3. चारित्र्य विकास Character Development
4. नातेसंबंध Social Relationships
5. व्यावसायिक विकास Professional Development
6. जीवन कौशल्ये Life Skills
7. सामाजिक योगदान Social Contribution
या फ्रेमवर्क विषयीची विस्तृत माहिती निर्माणच्या www.nirman.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मानसिक वा शारीरिक आजारांचा निव्वळ अभाव म्हणजे आपोआप निकोप व निरोगी वाढ असा अर्थ होत नाही. त्यातून फक्त इतकेच कळते की आपण अक्षाच्या ऋण बाजूला नाही आहोत तर शून्य बिंदूवर आहोत. अक्षाच्या धन बाजूला, सकारात्मक वाढीसाठीच्या अगणित संभावना आहेत आणि त्या शक्यतांना वास्तवात आणणे ही युवा पिढीची जाबाबदारी आणि बाकी सगळ्यांचे उत्तरदायित्व आहे. या रोमांचकारी प्रवासामध्ये हे फ्रेमवर्क उपयुक्त मार्गदर्शक ठरेल असा विश्वास निर्माण टीमला वाटतो.

Leave a Comment