हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा बघतोच तू कसा खासदार होतो ते.. असा भर लोकसभेच्या प्रचारात विरोधकांना दम भरणाऱ्या अजितदादांना (Ajit Pawar) आपल्या पत्नीलाच बारामतीतून निवडून आणता आलं नाही.. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थ पवार यांचा मावळमधून पराभव झाल्यानंतरचा अजितदादांच्या घरातील हा सलग दुसरा पराभव… लोकसभेत झालेल्या या पराभवातून अजितदादा सावरलेले नसताना आता चर्चा सुरु झालीय अजितदादांना पाडण्याची… होय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतूनच दस्तुरखुद्द अजितदादांची आमदारकी धोक्यात आलीय… नणंद विरुद्ध भावजयी हा बारामतीतल्या महानाट्याचा पहिला अध्याय आटोपल्यावर आता काका विरुद्ध पुतण्या हा नवा अंक बारामतीत रंगणार आहे.. पण यावेळेस काका असतील अजित पवार तर पुतण्या असेल युगेंद्र पवार.. पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत पक्षफुटीनंतर लोकसभेच्या निकालानंतर जनतेचा कौल तुतारीच्या बाजूने असल्याचं क्लिअर झालंय. पण आता आमदारकीच्या निवडणुकीत थेट पवारच पवारांना नडणार आहेत…महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री, अनेक खात्यांची मंत्रीपदं, विरोधी पक्षनेते आणि पक्षफुटीनंतर आता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या याच दादांचा विधानसभेला पराभव होतोय, अशी चिन्हं दिसतायत… युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी विधानसभेला लढत झालीच तर कोअर बारामतीकरांचा कौल कुणाच्या बाजूने राहील? मुलगा, बायको यांचा पराभव झाल्यावर आता दादांचा नंबर लागेल??
तर राष्ट्रवादी पक्ष फोडल्यावर मातब्बर नेत्यांना स्वत:च्या पक्षात घेतल्यावर दादा चांगले फॉर्मात आले…घड्याळ, चिन्हं आणि नाव त्यांना मिळाल्यावर तर त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही… लोकसभेच्या मिळालेल्या चारही जागा म्हणूनच अजितदादांनी प्रतिष्ठेच्या बनवल्या… बारामतीतून तर अजितदादांनी बहिणीच्या विरोधात बायकोला उभं करत विरोधाच्या ठिणग्या घरात नेऊन पोहचवल्या.. सुप्रियाताईंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी अजितदादांनी स्थानिक नेत्यांच्या विरोधापुढे नमतं घेतलं… हर्षवर्धन पाटील, विजयबापू शिवतारे यांना हाताशी धरत मोट बांधली.. मोदी, फडणवीस, स्वत: अजितदादा आणि पक्षातील बहुतांश नेते हे मतदानापर्यंत बारामतीत तळ ठोकून होते. मतदानानंतरची दादांची बॉडी लेग्वेंज पाहिली तर बारामतीची सीट कन्फर्म येतेय, असं बोललं जात होतं. पण निकाल लागला आणि सगळ्यांच्याच बत्त्या गुल झाल्या… कुणाचीही सीट आली तरी फारपार हजारांच्या घरात लागेल असा अंदाज बांधणाऱ्या विश्लेषकांच्या नाकावर टिच्चून सुप्रियाताई चक्क दिड लाखाच्या लीडने दणक्यात निवडून आल्या.. हे कमी होतं की काय म्हणून आकडवारीचं डिकोडींग केल्यावर समजलं की बारामतीतल्या सहापैकी पाच मतदारसंघात तुतारी लीडला दिसली… त्यात अजितदादा आमदार असणाऱ्या बारामती विधानसभेचाही समावेश होता… त्यामुळेच मुलगा आणि बायको पडल्यावर चर्चा सुरू झाली ती अजितदादांना पाडण्याची…
आणि याला कारण ठरलं ते एक नाव ते म्हणजे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) . अजितदादांनी पक्ष फोडल्यावर पवार कुटूंब शरद पवारांच्या बाजूने एकवटलं. यात आणखीन एका नव्या चेहऱ्याची भर झाली ते नाव म्हणजे युगेंद्र पवार.. अजितदादांच्या प्रत्येक संकटात त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते सुपुत्र… अजितदादांच्या विरोधात बारामतीतून सुप्रियाताईंच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी युगेंद्र पवार यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती.. बारामती शहर आणि ग्रामीण पट्टा युगेंद्र पवारांनी पिंजून काढला.. प्रत्येक गावात जाऊन सभा घेतल्या… घोंगडी बैठका घेतल्या.. सुप्रियाताई आणि शरद पवारांनी हा पट्टा युगेंद्र पवारांच्या खांद्यावर सोडला होता.. बारामती – निरा या पट्ट्यात रेवती सुळे आणि युगेंद्र पवार हे दोनच चेहरे प्रचार करत होते… त्यातल्या त्यात अजितदादा आणि त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनाही खांद्यावर घेण्यात युगेंद्र पवारांनी कोणतीच कसर सोडली नाही… याचाच इम्पॅक्ट म्हणून बारामतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांवर युगेंद्र पवार यांच्यावर भरसभेत टीका करण्याची वेळ आली…निकालानंतर बघून घेतो, असा सज्जड दमही भरला.. पण निकाल तुतारीच्या बाजूने लागला.. हा एक धक्का पचवताना अजितदादांना दुसरा धक्का बसला तो म्हणजे ते ज्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या बारामती विधानसभेतूनच ते ४५ हजारांनी पिछाडीवर गेले… हा आकडा स्पष्ट सांगतोय की अजितदादांची आमदारकी धोक्यात आलीय…
खासदारकीला पवार कुटुंबातले दोन्ही उमेदवार अटीतटीचे होते.. पण शरद पवार विधानसभेला दादांच्या विरोधात कुणाला उभं करायचं, याचा आधीच बंदोबस्त करुन आहेत… अजितदादांच्या बंडाळीला उत्तर म्हणून शरद पवार आता बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवार करतील, हे आता जवळपास फिक्स आहे.. बारामतीतील स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार युगेंद्र पवार यांनी मतदारसंघात आमदारकीच्या प्रचाराचा नारळही फोडला आहे..त्यामुळे बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या या नाट्याचा आता नवा अंक बघायला मिळणार आहे.. बारामतीतील जगताप, तावरे, काकडे, गायकवाड या मातब्बर घराण्यांनी सुनेत्रा वहिनींना निवडून आणण्यासाठी प्रचारात जंग जंग पछाडलं.. पण यांच्याच प्रभावक्षेत्रातल्या मतदान केंद्रावर घड्याळ बॅकफूटला जाऊन तुतारी जोरदार वाजलीय… यावरुन आपण अंदाज बांधू शकतो की शरद पवारांनी या पट्ट्यात आपली किती फिल्डींग लावली असेल… लोकसभेचं हेच चित्र विधानसभेलाही रिपीट झालं तर मुलगा, बायको यानंतर स्वत: दादांनाही पराभवाचा सर्वात मोठा धक्का बसू शकतो… बॉटम लाईन काय तर काकांना नडणं पुतण्याला भविष्यातही जड जाणार आहे असं दिसतंय…