कोरोनाच्या अनुषंगाने दहावी बारावीच्या परीक्षेसाठी झिगझॅग पद्धत 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च; तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने परीक्षेसाठी झिगझॅग पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून या काळात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी काय काळजी घ्यावी? याबाबत मंडळाने सर्व शिक्षक, मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था करण्यासाठी जास्तीत जास्त आकारमानाच्या खोल्यांचा वापर करावा, दोन बॅंचमध्ये पुरेसे अंतर ठेवावे, वर्गखोलीत एका बेंचवर एकच विद्यार्थी याप्रमाणे झिगझॅग पद्धतीने बसविण्यात यावेत, याबाबत केंद्र संचालक, उपकेंद्रसंचालकांना सूचित केले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने परीक्षेपूर्वी केंद्राच्या वर्ग खोल्या, स्वच्छतागृहे व संपूर्ण परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करावे. परीक्षा कालावधी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आवश्यक तेथे साबण, हॅण्डवॉश ठेवावे. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनद्वारे तापमान चेक करावे, सॅनिटायझर, मास्क वापरण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्यास आवश्यक कार्यवाही करावी.

शिक्षकांसाठी सूचना –

शिक्षकांनी प्रश्नपत्रिका जमा करणे, उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे इतर सर्व आनुषंगिक कामे करताना पुरेसे अंतर ठेवावे. गैरहजर विद्यार्थी किंवा अन्य कारणामुळे शिल्लक राहिलेल्या प्रश्नपत्रिका, पेपर संपेपर्यंत पर्यवेक्षकाने स्वतःकडे जपून ठेवाव्यात, त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच दैनंदिन गैरमार्ग प्रकरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अनुपस्थिती व आनुषंगिक माहिती प्रत्येक पेपर संपल्यावर ऑनलाइन सादर करावी, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.