कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील वाल्मिकी पठारावरील कारळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अज्ञातांनी नासधूस केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केबल कापून शालेय पोषण आहार साहित्य व कागदपत्रांचे नुकसान केले. यासंदर्भात ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी, वाल्मिकी पठारावरील कारळे या दुर्गम व डोंगराळ गावातील शाळा सकाळी नेहमीप्रमाणे उघडल्यानंतर वर्गात मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती शिक्षकांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. शाळेतील पोषण आहारासाठी वापरण्यात येणारे तेल चटणी व अन्य साहित्य ठिकठिकाणी बेंचवर कागदपत्रावर ठेवून नुकसान करण्यात आले होते. तसेच पुस्तके शालेय कागदपत्रांनाही नुकसान पोहोचल्याचे दिसून आले. अज्ञात व्यक्तीने हा प्रकार करताना शाळेच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केबल कापल्याचे आढळले.
दुर्गम भागातील शाळा असूनही आयएसओ मानांकित डिजिटल शाळा आहे.या शाळेला लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात लाभल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, कोणत्या कारणाने ही घटना घडली असावी आणि कुणी हा प्रकार केला असावा याबद्दल माहिती मिळू शकली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भोसले अधिक तपास करीत आहेत.