सातारा | जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने स्व:मालकीचे सभागृह सोडून सदस्यांचे प्रशिक्षण शहरालगतच्या मंगल कार्यालयात घेऊन झेडपीचा महसूल का बुडविला? असा प्रश्न सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करून ग्रामपंचायतीच्या गैरकारभारावर आवाज उठविला. यावर सीईओ विनय गौडा यांनी पुढील काळात काळजी घेऊ, असे सांगत ग्रामपंचायत विभागाच्या चुकीच्या कारभाराची सारवासारव केली. तर यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे यांनी मंगल कार्यालयला केवळ दिवसाला 15 हजार भाडे द्यावे लागल्याचा खुलासा केला. अधिकाऱ्यांच्या या मनमानी गैरकारभारामुळे झेडपीला अर्थिक भार सोसावा लागला आहे.
दरम्यान, पुढील काळात सदस्यांचे प्रशिक्षण शहरातील इतर सभागृहात न घेता जिल्हा परिषदेच्या सभागृहातच घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आज छत्रपती शिवाजी सभागृहात झाली. या वेळी प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, सदस्य संजीवराजे निंबाळकर, भीमराव पाटील, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार, सुवर्णा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसाठी महाराष्ट्र ग्राम स्वराज अभियानांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण झाले. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने हे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात न घेता लाखो रुपयांची उधळपट्टी करत शहरालगतच्या मंगल कार्यालयात घेतले होते. प्रशिक्षणात ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे लाखो रुपये पाण्यात गेल्याने त्याचे पडसाद स्थायी समितीच्या सभेत उमटले. सदस्य गुदगे यांनी महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी सदस्यांचे प्रशिक्षण असते, तर समजून घेतले असते. मात्र, ग्रामपंचायत विभागाने झेडपीचे सभागृह असताना शहरालगतच्या खासगी सभागृहात प्रशिक्षण घेतल्याचे सांगत ग्रामपंचायतीच्या कारभारावर ताशेरे ओढले. यावर श्री. विधाते यांनी झेडपीचा महसूल वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगून अप्रत्यक्षपणे ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली