आशा सेविका व गट प्रवर्तक यांचे प्रश्न मार्गी लावणार – संजुबाबा गायकवाड

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील सर्व आशा सेविका व गट प्रवर्तक यांनी पंचायत समितीच्या आवारात निदर्शने करून त्यांच्या समस्या निवेदन देऊन मांडल्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत करावयाच्या कामामध्ये असणाऱ्या जबाबदाऱ्या व मिळणारे मानधन यांच्याविषयी आशा सेविका संघटनेने उपसभापती संजुबाबा गायकवाड यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी चर्चेतून समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कटिबद्ध असून तुमचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन गायकवाड यांनी दिले.

महाबळेश्वर तालुका दुर्गम, अति पर्जन्यमान असलेला, डोंगराळ व विस्तीर्ण असा तालुका असून प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पोहचून आरोग्य सेवा देण्याचं काम सर्व आशा सेविका करीत आहेत. अतिशय कमी मानधनात हे काम केलं जात आहे. गेल्या ६ महिन्यापासून कोरोनाच्या संकटात जीवाची पर्वा न करता प्रमाणिकपणे काम करून गावच्या गाव कोरोनामुक्त करण्यामध्ये आशा सेविकांचं मोलाचं योगदान आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोना किट आशा सेविकेंना उपलब्ध करून दिले असून काही ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या तात्काळ सोडविल्या जातील असे सूचित करून माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे काम आशा सेविकेंना आंदोलन न करता ते सुरू करावे अशा सूचना गायकवाड यांनी केल्या.

आशा सेविकांकडे असणाऱ्या अँड्रॉइड फोनच्या, दिवसात ५० कुटुंब सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी बाबतीत चर्चा करून या बाबत आरोग्य विभागास सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच इतर सेवाविषयक व मानधन विषयक अडचणींचा निपटारा होण्याच्या दृष्टीने आमदार मकरंद आबा पाटील यांच्याकडे चर्चा करून मंत्रालय स्तरावर प्रयत्न केले जातील असंही गायकवाड पुढे म्हणाले. मानधनाच्या बाबतीत वाढीव रक्कम रु २०००/- चा दुसरा लाभ देण्याबाबत ग्रामपंचायतीस कळवून तोही प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही गायकवाड यांनी दिली. यावेळी गट विकास अधिकारी नारायण घोलप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ कदम, विकास अधिकारी रवींद्र सांगळे, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like