मुंबई । सतिश शिंदे
आदिवासी विद्यार्थ्यांना आता आणखी उत्तम आरोग्य सुविधा मिळणार असून आदिवासी विद्यार्थी यापुढे उपचाराच्या सुविधेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अटल आरोग्य वाहिनी व कायापालट अभियान या योजनेचे उद्घाटन व लोकार्पण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आयोजित या सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, विभागाचे प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा व इतर अधिकारी उपस्थित होते.
दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य उत्तम राहील यासाठीची महत्त्वपूर्ण असलेली ही योजना आदिवासी विकास विभागाने कार्यान्वित केली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले. या सुविधेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना दुहेरी लाभ होणार आहे. एकतर त्यांची नियमित आरोग्य तपासणी होऊन त्यांना असणाऱ्या आजाराविषयीची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध होईल. तसेच तपासणीअंती आढळणाऱ्या अथवा अकस्मात उद्भवणाऱ्या आजारावर उपचार केले जातील. अटल आरोग्य वाहिनी ही सुसज्ज अशी रुग्ण वाहिका असून याचाही लाभ विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने होईल असेही ते म्हणाले. या योजनेसाठी मदत केलेल्या सर्व घटकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करुन योजनेचे लोकार्पण केले.
प्रदान केलेल्या सेवा –
ARAI प्रमाणित बेसिफ लाईक सपोर्ट ॲम्बुलन्स/रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24 x 7 तातडीची वैद्यकीय सेवा
रुग्णवाहिकांच्या समन्वयासाठी 24 x 7 इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर
प्रतिदिन क्लस्टर शाळांमधील विद्यार्थ्यांची डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी
हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमच्या माध्यमातून प्रकल्प स्थितीचा आढावा.
मोबाईल ॲप माध्यमातून डिजिटल हेल्थ कार्ड
वैद्यकीय विशेषज्ञांच्या माध्यमातून उपचार सल्ला व आवश्यकतेनुसार रुग्णालयात पाठवण्यासाठी मार्गदर्शन
शाळांमध्ये सर्व सोयींनीयुक्त अशा डिस्पेंसरीजची स्थापना दुर्गम भागात असलेल्या या शाळांमधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकी चार ते सहा आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांचा एक समूह, असे 48 क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक क्लस्टरसाठी एक याप्रमाणे 48 सुसज्ज रुग्णवाहिका 24 तास मैदानात असतील. बेसिक लाईफ सपोर्ट (बीएलएस) सह सज्ज असणाऱ्या या रुग्णवाहिकांमध्ये दोन डॉक्टर्स व एक आरोग्य सहायक उपलब्ध असतील.
या योजनेंतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे. साथीच्या रोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक औषधे व इंजेक्शन यांचा पुरेसा साठा उपलब्ध असेल. प्रत्येक विद्यार्थ्यांचे डिजिटल हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार असून त्यावर त्या विद्यार्थ्यांचा आरोग्य तपासणीबाबतची पूर्ण माहिती असेल. नियमित डॉक्टरांबरोबरच डोळे, त्चचारोग, कान, नाक घसा या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवाही उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी दिली. या भागात तैनात करण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांमध्ये ईसीजी, ऑक्सिजन सिलेंडर, तसेच अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असतील. आश्रमशाळा दुर्गम भागात असल्याने सर्प, विंचू दंश यावरील उपचारासाठी लागणाऱ्या अँटी व्हेनम इंजेक्शनचा पुरेसा साठा असेल अशी माहिती दिली.
या सर्वसमावेशक आरोग्य योजनेत विद्यार्थ्यांबरोबरच पालक व त्या परिसरात आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत एक आरोग्य समिती नेमण्यात येणार आहे. या समितीत विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा समावेश असेल.
गुणवंतांचा सत्कार या योजनेच्या निमित्ताने विभागाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यातील विजेत्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियानास कायापालट अभियान हे नाव सुचविणारे सचिन विभूते तसेच योजनेस अटल आरोग्य वाहिनी-आदिवासी जीवन दायिनी हे घोषवाक्य सुचविणारे नितीन शेळके तसेच बीव्हीजीचे हनुमंतराव गायकवाड, किशोर देव, ज्ञानेश्वर शेळके, विभागाचे आरोग्य सल्लागार डॉ.मोहम्मद साकवान यांचा समावेश आहे.
यावेळी विभागाच्यावतीने तयार केलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी दीप प्रज्वलन करुन अभियानाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांनी सुसज्ज अशा रुग्ण वाहिकांना हिरवा झेंडा दाखवून सेवेचा शुभारंभ केला.