अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा

प्रातिनिधीक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी। जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील एका शेतकऱ्याला पाझर तलावासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी मागील १० वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे ‘मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांच्या संगनमताने अडवणूक करत असल्याचे निवेदन भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मार्फत दिनांक २८ सप्टेंबर रोजी संबंधित शेतकऱ्याने दिले असून मोबदला तत्काळ द्यावा अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील सावरगाव शिवारातील गट नं. ७९,८०,८८,८९ मधील जमीन लघुसिंचन जलसंधारण विभाग जालना कार्यालयाने पाझर तलाव करण्यासाठी संपादीत केली होती. मात्र मागील १० वर्षांपासून जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यातच मागील दोन वर्षात जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, जलसंधारण अधिकारी हे संगनमत करून अडवणूक करत आहेत. यामध्ये दिनांक ५ जानेवारी २०१८, ३० मे २०१८,१५ मे २०१९ आणि १६ सप्टेंबर २०१९ रोजी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, संजय कुंडेटकर,उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरवलसिंग, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कछवा जेजुरकर आदी जणांनी स्थळ पाहणी करून अहवाल सादर केलेले आहेत.

तरी पण भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण केली गेली नाही. त्यातच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पूर्वी एकवेळ संयुक्त मोजणी झालेली असतानाही पुन्हा दिनांक १५जुलै २०१९ व १६ सप्टेंबर २०१९ दोन वेळेस संयुक्त मोजणी करण्यात आली असूनही भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली नाही. यातच मागील १० वर्षांपासून जमिनीचे खोदकाम झाले असल्याने त्या ठिकाणी पिके घेता येत नाहीत. सोबतच दुष्काळाची स्थिती असल्याने उपासमारीची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. परिणामी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे’ असे निवेदनात शेतकऱ्याने नमूद केले आहे. दरम्यान शेतकऱ्याच्या या निवेदनानंतर तरी अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलावीत अशी आशा शेतकरी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.