उस्मानाबाद प्रतिनिधी | जालन्यातील महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्री गो बॅक अशा घोषणा देत ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी पूजा मोरे यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता मोरे यांचा मुख्यमंत्र्यांसह पोलिसांनीही चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी औरंगाबाद येथे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर उस्मानाबामध्ये आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिस ठाण्यात नेले.त्यांना ताब्यात घेत असताना स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटपट झाली असंल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना अटक केल्याची बातमी माध्यमांतून प्रसिद्ध होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने दखल घेत पोलिसांना फोन केल्याने पूजा यांची सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र महाजनादेश यात्राकाढून विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशारा २५ ऑगस्ट रोजी दिला होता. त्यानंतर आठवडाभरातच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जालना येथे आली. तेंव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा माेरे यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले होते. याप्रकरणी त्यांना जालना पोलिसांनी अटकही केली होती.आता पुन्हा असं काही होईल कि काय याच भीतीने पोलिसांनी मोरे याना ताब्यात घेतले असल्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.