वृत्तसंस्था | भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान आज मध्यरात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाणार आहे. हे ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी 60 विद्यार्थ्यांसोबत बंगळुरुमधील इस्त्रोच्या सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत. यामध्ये बारामतीच्या सिद्धी पवार या विद्यार्थीनीचाही समावेश आहे.
इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 चं 22 जुलै रोजी अवकाशात झेपावलं होतं. चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम आहे. याआधी भारताने 2008 मध्ये चांद्रयान 1 चं प्रक्षेपण केलं होतं.
चांद्रयान-2 सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर उतरण्यासाठी चांद्रयान 2 ला जवळपास 55 दिवस लागले. चांद्रयान चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरणार आहे. यानंतर वैज्ञानिकांना चंद्राच्या अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे.
चांद्रयान-2 च्या निमित्ताने 11 वर्षांनी इस्रो पुन्हा एकदा चंद्रावर तिरंगा फडकावणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश बनेल. चंद्राच्या या भागात उतरण्याचं धाडस अद्याप कोणत्याही देशानं केलेलं नाही.