सोलापूर प्रतिनिधी। करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आज थकित पगारासाठी आपल्या कुटुंबांसह रस्ता रोको आंदोलन केले आहे. आदिनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे 41 महिन्यांचे वेतन थकले आहेत. वारंवार मागणी करूनही कारखान्याचे संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. कारखान्याचा कारभार पारदर्शक नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.
कारखान्यास वेतन मंडळाच्या शिफारशी लागू आहेत. 25 वर्षात अनेकांच्या कायम व हंगामी नियुक्त्या केल्या आहेत. एखाद्या कामगाराने कार्यकारी संचालकाकडे आजारपण, शैक्षणिक, खर्चासाठी पैशाची मागणी केल्यास दमदाटी केली जाते. आमचा संसार उघड्यावर आला आहे असे महिलांनी या रस्ता रोकोवेळी बोलताना रडत आपल्या व्यथा मांडल्या. पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित केले.