बुलढाणा प्रतिनिधी| निसर्गाचे अनेक आश्चर्य , चमत्कार , भूगर्भातील होणारे बदल आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. असेच एक भौगोलिक आश्चर्य बुलडाणा जिल्ह्यात पाहायला मिळतं आहे. ते म्हणजे गारगोट्यांचा डोंगर…. जो नागरिकांसाठी कुतुहलतेचा विषय ठरत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वत रांगेचा हा खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील परिसर… या डोंगरावरील काही भागात गारगोटी हा दगडाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात पडलेला आढळून येतो. डोंगरावर या गारगोट्यांची अक्षरशः चादर पसरलेली दिसते. या ठिकाणी खोदून पाहिल्यास जमिनीच्या आत हा दगड दिसत नाही. त्याच प्रमाणे डोंगरावरील हा परिसर सोडला तर इतर ठिकाणी देखील ह्या गारगोट्या दिसत नाहीत. त्यामुळे ह्या ठिकाणीच एवढा मोठा सडा पडला कसा?? ह्या गारगोट्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या कोठून?? हे एक आश्चर्यच आहे. हा गारगोटी नावाचा प्रकार जुन्या काळी अग्नी निर्माण करण्यासाठी वापरत होते. त्याला ‘चकमक’ असे म्हणत होते. तर अजून देखील काही प्रमाणात जंगलात भटकंती करणारे समूह याचा अग्नी निर्माण करण्यासाठी वापर करतात. अश्याच प्रकारचे काही दगड अजिंठा – वेरूळ सारख्या पर्यटन स्थळी विक्रीसाठी देखील ठेवलेले असतात. ज्याला विदेशी पर्यटकांकडून चांगल्या पद्धतीने मागणी असते. या ठिकाणी भूगर्भातील काही बदल आणि हालचाली ह्या गोष्टीला नक्कीच कारणीभूत असाव्यात असे अंदाज लावले जात आहेत. याकडे परिसरातील नागरिक कुतुहलतेचा विषय म्हणून तर काही नैसर्गिक आश्चर्य, चमत्कार म्हणून देखील पाहत आहेत. त्यामुळे या सर्व परिसराची भौगोलिक शास्त्रज्ञांकडून चिकीत्सा होणे गरजेचे आहे.