मुंबई | सतिश शिंदे
प्रधानमंत्री आवास योजना, औद्योगिक गुंतवणूक, थेट परकीय गुंतवणूक, रोजगार निर्मिती, राज्याची अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असून इतर महत्त्वाच्या योजनाही लवकरच पूर्णत्त्वास येणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत व्यक्त केला. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुंबई तसेच राज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, गृहनिर्माण, राज्याच्या अर्थव्यवस्थेची मजबुती, नवोद्योगांची (स्टार्टअप) सुरुवात, कायदा व सुव्यवस्था आदी अनेक विषयांना स्पर्श केला.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलते. प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) ग्रामीण चे 2020 पर्यंत राज्याला 7 लाख 38 हजार घरांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 5 लाख 91 हजार घरांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 5 लाख 82 हजार घरे पूर्ण करण्यात आली आहेत. पीएमएवाय शहरी अंतर्गत 9 लाख 1 हजार घरांच्या उद्दिष्टांपैकी 4 लाख 31 हजार 465 घरांचे काम सुरू केले आहे. सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील साडेदहा लाख लोकांना 2019 पर्यंत ग्रामीण घरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाचा महामार्ग
समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाचा महामार्ग असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या मार्गामुळे राज्यातील 10 जिल्हे थेट तर 14 जिल्हे अप्रत्यक्षरित्या याप्रमाणे एकूण 24 जिल्हे जोडले जाणार आहेत. राज्यातील चारही विभागांचा विकास यामुळे होणार आहे. कृषी क्षेत्राशी निगडित उद्योगांना चालना मिळणार आहे.
राज्यस्तरीय योजनांवर योजनांवर 2018 मध्ये 67 हजार 831 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अनुसूचित जाती उपयोजनांवर 9 हजार 949 कोटी रुपये तर अनुसूचित जमाती उपयोजनांतर्गत राज्यामध्ये 8 हजार 970 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सकल राज्य उत्पन्नाशी राजकोषीय तुटीचे प्रमाण घटले आहे असेही ते म्हणाले.
मुंबईत 258 कि.मी.च्या मेट्रोच्या कामांना मान्यता
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबईसाठी मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक, सागरी सेतू, कोस्टल रोड असे दळणवळण प्रकल्प गतीने राबविण्यात येत आहेत. दिल्लीनंतर सर्वाधिक लांबीचे मेट्रोमार्ग मुंबईमध्ये होत असून 258 कि.मी. लांबीच्या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरु आहेत. पुणे मेट्रोचे काम देखील गतीने सुरू असून पहिल्याच वर्षात 25 टक्के काम पूर्ण केले आहे. दुसऱ्या टप्प्यात शिवाजीनगर ते हिंजेवाडी या मेट्रो प्रकल्पासाठी देशात पहिल्यांदाच ‘व्हायाबिलीटी गॅप फंडींग’ या संकल्पनेचा वापर करण्यात आला आहे. नागपूर मेट्रोचे 73 टक्के काम पूर्ण झाले असून पुढी मार्चपर्यंत 1 मार्गिका पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या कोस्टल रोडच्या कामांना राज्य शासनाचा प्राधान्यक्रम असून वांद्रे- वरळी सी लिंकला जोडून होत असलेल्या वांद्रे-वर्सोवा सी लिंक बरोबरच नवीन वर्सोवा ते विरार सी लिंक करण्याच्यादृष्टीनेही सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पासाठी जिओ टेक्निकल सर्वेक्षण व समुद्रातील बोअरींगचे काम सुरु करण्यात आले आहे.
कौशल्य विकास
राज्यात रोजगारात वाढ झाली असून 2 लाख सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शिकाऊ उमेदवारी अंतर्गत राज्यात 2 लाख शिकाऊ उमेदवारांना रोजगार प्राप्त झाले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांपैकी 1 लाख 60 हजार उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे.
नवी मुंबई विमानतळ
नवी मुंबई विमानतळाचे काम गतीने सुरु असून डिसेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे. कामाची गती पाहता मार्च ते एप्रिल 2020 पर्यंत विमानतळाची एक धावपट्टी आणि टर्मिनलची इमारत पूर्ण होईल, असा विश्वास आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारली असून महिला वर्गामध्ये जागृती आल्यामुळे अन्यायाविरोधीच्या गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पुरुषी मानसिकतेला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
अंतिम आठवडा प्रस्ताव सदस्य छगन भुजबळ यांनी मांडला. चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सुनील केदार, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित पुढील अधिवेशन 18 फेब्रुवारी 2019 ला मुंबईत
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता करण्यात आली. पुढील अधिवेशन विधानभवन मुंबई येथे १८ फेब्रुवारी २०१९ पासून येथे होणार आहे.