मुंबई । राज्यसभा खासदार जया बच्चन यानी कंगना राणावतवर निशाणा साधल्यानंतर सोशल मीडियातून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत . महाराष्ट्र सरकारने याची गंभीर दखल घेतली असून बच्चन कुटुंबाच्या मुंबईतील दोन्ही बंगल्यांना तातडीने अधिक सुरक्षा पुरवली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलीवूडलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात असताना जया बच्चन यांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि भाजप खासदार रवी किशन यांच्यावर मंगळवारी राज्यसभेत जोरदार निशाणा साधला. या टीकेनंतर जया बच्चन यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत.
बच्चन कुटुंबीयांच्या बंगल्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्यानंतर त्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार पक्षपातीपणे वागत आहे. ठाकरे सरकारच्या सुरात सूर मिसळल्यास त्याला लगेचच सुरक्षा दिली जात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हीच तत्परता सुशांत प्रकरण आणि कंगनाच्या बाबतीत का दाखवण्यात आली नाही, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.
दरम्यान, ‘जिस थाली में खाया, उसी में छेद किया’ अशा शब्दांत जया बच्चन यांनी रवी किशन आणि कंगना राणावत यांना फटकारले. केवळ काही लोकांमुळे तुम्ही संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करू शकत नाही. ज्या इंडस्ट्रीने आपल्याला नाव दिलं त्याच इंडस्ट्रीला गटार म्हणणं योग्य नाही, असे सुनावताना या प्रवृत्तींची बाजू घेतल्याबद्दल जया यांनी रवी किशन यांना खडेबोल सुनावले होते. जया यांच्या राज्यसभेतील या सडेतोड भूमिकेनंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सिनेसृष्टीतून अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, जेनेलिया देशमुख, सोनम कपूर, चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा, शबाना आझमी आणि अन्य काही कलावंतांनी जया बच्चन यांच्या विधानाचे उघड समर्थन केले आहे तर काहींना जया बच्चन यांच्या विधानाला तीव्र विरोध केला आहे.
जया यांच्या भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून जया बच्चन व कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात असल्याने त्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांचं दोन बंगल्यांत वास्तव्य असून या दोन्ही बंगल्यांना तातडीने सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बंगल्यांची सुरक्षा वाढवली असली तरी बच्चन कुटुंबीयांच्या वैयक्तिक सुरक्षेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बच्चन कुटुंबीयांचे बंगले प्रसिद्ध आहेत. हे बंगले पाहण्यासाठी नेहमीच चाहत्यांची वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन त्याचा गैरफायदा घेत कुणी आगळीक केल्यास अनर्थ घडू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊनच सुरक्षेबाबत खबरदारीची पावले टाकण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.